गुगल नेव्हीगेशनने चुकवली डेंटलची नीट परीक्षा, दोन कुडचींनी केला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:51 PM2020-12-17T17:51:34+5:302020-12-17T17:54:41+5:30
College, college, educationsector, sangli, NeetExam, डेंटल शाखेतून पदवीधर झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षा गूगल मॅपवर विसंबल्याने चुकली. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. सहानुभूतीचे धोरण ठेऊन आणखी एक परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.
सांगली : डेंटल शाखेतून पदवीधर झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची पदव्युत्तर परीक्षा गूगल मॅपवर विसंबल्याने चुकली. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. सहानुभूतीचे धोरण ठेऊन आणखी एक परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.
तंत्रज्ञानावर नको तितके विसंबल्याने विद्यार्थ्यांना फटका बसला. डेंटल शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठीची देशव्यापी नीट परीक्षा बुधवारी (दि. १६) होती. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जवळचे केंद्र म्हणून बेळगावची निवड केली. त्यांना कुडची हे केंद्र मिळाले होते. बेळगाव जिल्ह्यात दोन कुडची आहेत.
एक कुडची मिरजेपासून सुमारे तीस-पस्तीस किलोमीटरवर रायबाग तालुक्यात आहे, तर दुसरे बेळगाव शहराचे उपनगर आहे. परीक्षेला जाणार्या या विद्यार्थ्यांनी कुडचीच्या शोधासाठी परंतु गुगल मॅपवर नेव्हीगेशन लावले.
तास-दोन तासांच्या प्रवासानंतर बेळगावच्या कुडचीऐवजी रायबाग तालुक्यातील कुडचीमध्ये पोहोचले. गावात पोहोचल्यानंतरही परीक्षा केंद्र ५० मीटरवर असल्याचे गुगल नेव्हीगेशन सांगत होते. अवघ्या चार-पाच हजार लोकवस्तीच्या छोट्याशा खेड्यात परीक्षा केंद्र कसे असेल? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.
गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना विचारले असता वैद्यकीय परीक्षेचे कोणतेही केंद्र गावात नसल्याचे त्यांनी सांगितले. रायबागमधील कुडची व बेळगावमधील कुडची ही दोन वेगवेगळी ठिकाणे असल्याचा खुलासाही केला.
धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा केंद्राचा संपर्क क्रमांक गुगलवरून शोधला. परीक्षेच्या संयोजकांनी दुपारी पावणेदोनपर्यंत आल्यास परीक्षा देता येईल असे सांगितले. पण या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता आलेच नाही. परीक्षा चुकल्याने वर्ष वाया गेले.