राजकीय क्षेत्रात खळबळ-नागपूर येथे गोपीचंद पडळकरांशी चर्चा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 05:16 PM2019-04-02T17:16:00+5:302019-04-02T17:16:41+5:30
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीच्या जागेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते.
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीच्या जागेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर विरोधक असताना त्यांच्या धारकऱ्यास उमेदवारी कशी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.
नागपूर येथे थोड्याच वेळात आंबेडकर व पडळकर यांच्यात बैठक होऊन उमेदवारीबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे. पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत. शिवरायांच्या सुवर्ण सिंहासन मोहिमेसाठी पडळकर यांनी भिडे यांना ११ लाख रुपयांची मदत केली होती. तसेच अनेक गडमोहिमेत ते सहभागी होते.
प्रकाश आंबेडकर हे भिडे गुरूजींचे कट्टर विरोधक आहेत. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात भिडे गुरूजी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी तीव्र आंदोलन केले होते. आंबेडकरी जनतेमध्येही भिडे यांच्याविषयी नाराजी आहे. भिडे यांच्यासोबत पडळकर यांची अनेक छायाचित्रेही आहेत. पडळकरांच्या सामाजिक प्रवासाला भिडे यांचे नेहमी पाठबळ राहीले आहे. अशा परिस्थितीत त्यांना उमेदवारी दिली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन दिवसापूर्वी सांगलीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिली होती, त्यात बदल करून याच जागेवर पडळकरांना उमेदवारी दिली जाणार आहे.