गोपीचंद पडळकर समर्थकांकडून खासदार समर्थकांचा निषेध
By अविनाश कोळी | Published: January 10, 2024 07:11 PM2024-01-10T19:11:03+5:302024-01-10T19:11:25+5:30
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे खासदार संजय पाटील यांचा आटपाडी तालुक्यातील वंचित १३ गावांचा समावेश टेंभू योजनेत समावेश ...
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे खासदार संजय पाटील यांचा आटपाडी तालुक्यातील वंचित १३ गावांचा समावेश टेंभू योजनेत समावेश केल्याबद्दल दिघंची येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान फलकावर आमदार गोपीचंद पडळकर यांचे छायाचित्र नसल्याने पडळकर समर्थकांनी या कार्यक्रमाचा निषेध केला.
दिघंची येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुले-शाहू-आंबेडकर चौक ते दिघंची हायस्कूलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खांबांवर विविध नेत्यांचे फलक लावण्यात आले हाेते. या फलकांवर आमदार गोपीचंद पडळकर यांचे छायाचित्र नसल्याने पडळकर समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. खासदारांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा समाजमाध्यमांवर जाहीर निषेध व्यक्त करत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
आमदार गोपीचंद पडळकर गटाला डावलून खासदार संजय पाटील गटाला काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमदार पडळकर गटाला डावलल्याने दिघंची जिल्हा परिषद गटातील आमदार व खासदार समर्थकांमधील धुसफुस समाेर आली आहे. खासदार संजय पाटील यांच्या कार्यक्रमाला पडळकर गटाचा कोणताही नेता अथवा एकही समर्थक उपस्थित नसल्याने आमदार व खासदार गटाचे बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.