Vidhan Sabha 2019: गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:52 PM2019-09-26T12:52:14+5:302019-09-26T13:00:38+5:30
वंचित बहुजन आघाडीचे काम आजपासून बंद केले आहे.
सांगली : वंचित बहुजन आघाडीचे काम आजपासून बंद केले आहे. मी राजीनामा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार सकारात्मक आहे. पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असून, सर्व पक्षांकडून मला ऑफर असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. गोपीचंद पडळकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 2 दिवसांत कार्यकर्त्यांची चर्चा करून गोपीचंद पडळकर भाजपाचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविणारे गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत.
जत अथवा खानापूर मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणुकीला उभे राहणार असल्याचं बोललं जात आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभरात गोपीचंद पडळकर प्रसिद्ध आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. मात्र धनगर समाजाचे प्रश्न सत्ताधारी भाजपाच सोडवू शकते, असं कार्यकर्त्यांना वाटतं. जर धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याकडे केला आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोपीचंद पडळकर यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी भाजपाच्या संजयकाका पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. तब्बल 3 लाखांहून अधिक मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना जत मतदारसंघातून 53 हजार तर खानापूर मतदारसंघातून 78 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तृत्वामुळे अनेक तरुण त्यांच्यामागे उभे राहतात. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन जत अथवा खानापूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जतमध्ये विद्यमान भाजपा आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जगताप यांचे तिकीट कापून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळू शकते.