गोपीशेठ, शर्यती बैलांसाठी की राजकारणासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:45+5:302021-08-20T04:30:45+5:30
सांगली : भाजपचे बहुचर्चित आमदार गोपीचंद पडळकर तथा गोपीशेठ पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले आहेत. निमित्त आहे त्यांनी भरवलेल्या ...
सांगली : भाजपचे बहुचर्चित आमदार गोपीचंद पडळकर तथा गोपीशेठ पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले आहेत. निमित्त आहे त्यांनी भरवलेल्या बैलगाडी शर्यतींचं. राजकारणात सध्या कशाची चलती आहे आणि त्याबाबत ‘टायमिंग’ कसं साधायचं, यात ते माहीर झालेत. बैलगाडी शर्यतींच्या मागणीचं मूळ धरू लागताच गोपीशेठ सजग झाले. न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत त्यांनी बैलगाडी शर्यती आयोजित केल्याचं सांगून लाखाच्या बक्षिसांचा खुर्दाही जाहीर केला. यातून बैलांचं संवर्धन कसं होणार, याचं तर्कसंगत उत्तर त्यांच्याकडे नाही. लोकानुनय करता-करता सवंगपणाच्या राजकारणात ते गुरफटलेत, एवढं मात्र नक्की.
शर्यतींमध्ये बैलांचा अमानुष छळ होत असल्याची याचिका दाखल झाल्यानं २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं शर्यतींना चाप लावला. अर्थात गोपीशेठ कायदा-सुव्यवस्था फाट्यावर मारण्यात तरबेज. शर्यतींची मागणी लावून धरण्याची विनंती करण्यास गेलेल्यांना पाठीशी राहण्याचा धीर तर दिलाच; पण स्वत:च्या झरे गावात २० ऑगस्टला शर्यती भरवत असल्याचा शड्डूही त्यांनी ठोकला. शौकिनांच्या टाळ्या मिळाल्या! पण तिकडं हालचाली झाल्या आणि बैलगाडी शर्यती रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा हलली. शेठना आयती संधी मिळाली. शर्यती रोखण्यामागं आणि शासकीय यंत्रणा कामाला लावण्यामागं राष्ट्रवादी असल्याची तोफ त्यांनी डागली. राष्ट्रवादीला लक्ष्य केल्यानं आपला ‘युएसपी’ वाढतो, राज्यभर चालणारी बातमी होते, हे एव्हाना त्यांच्या चांगलंच लक्षात आलंय...
गोवंश अर्थात बैलांच्या संवर्धनासाठी शर्यती होणारच, असं ठासून सांगणारे गोपीशेठ बैलांचा अनन्वित छळ रोखण्यासाठी शर्यतींवर बंदी घातलीय, हे विसरलेत. अस्सल मराठी मातीतल्या रांगड्या बैलगाडी शर्यतींचं स्वरूप अलीकडं बिघडलं होतं. बैलांच्या शेपट्या पिरगाळणं, त्या दातानं चावणं, बॅटरीचा शॉक देणं, वृषण पिळणं, रक्तबंबाळ होईपर्यंत टोचणं, काठ्या-चाबकानं फोडून काढणं, दारू पाजणं असले प्रकार वाढले. वेसण घालूनही पुन्हा तसं घडल्याचे पुरावे पुढं आल्यानंच न्यायालयानं शर्यती थांबविल्या. काही शौकिनांनी विनालाठी, विनाचाबूक शर्यतींची अट घातली; पण अशा स्पर्धा हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच. महाराष्ट्रात त्या पुन्हा सुरू झाल्या तर छळाचे प्रकार घडणारच नाहीत, याची काय हमी?
जाता-जाता : अंगावर आलेल्याला गोपीशेठ नेहमी शिंगावर घेतात. कधीकधी लोकानुनय सवंगपणाकडे झुकतो. महागात पडतो. काही वर्षांपूर्वी गोपीशेठ आणि त्यांच्या पोरांनी टेंभूचं कार्यालय फोडलं होतं. गुन्हे दाखल झाले. त्यात काहीजण विनाकारण भरडले गेले. अजून कोर्टकचेऱ्या सुरू आहेत. शर्यतींसाठी शंभर बैलगाड्या बोलावल्यात. शौकीन-कार्यकर्तेही येताहेत. न्यायालयाची बंदी आहे, संचारबंदी आहे, त्यातच कोरोनाच्या संकटकाळात शर्यतींबाबत गुन्हे दाखल झाले तर ‘करिअर’ बरबाद; पण कायद्याच्या या चाबकाची तमा ना गोपीशेठना, ना शौकिनांना!