शासन भांडवलदारी दलालांचे पोशिंदे

By admin | Published: February 24, 2017 11:46 PM2017-02-24T23:46:10+5:302017-02-24T23:46:10+5:30

नरसय्या आडम : वाळव्यात ‘अरुणभैया नायकवडी पुरस्कारा’ने गौरव

Governance of the capitalist broker | शासन भांडवलदारी दलालांचे पोशिंदे

शासन भांडवलदारी दलालांचे पोशिंदे

Next


वाळवा : वीस भांडवलदारांचे सात लाख कोटी थकित बॅँक कर्ज माफ होते. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज थकले, तर त्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो. भांडवलदार आणि दलालांचा विकास होऊ लागला आहे. नऊ हजार कोटीचे बॅँक कर्ज बुडवून विजय मल्ल्या रात्रीत परदेशात पळून जातो. परंतु शेतकऱ्याने वीज बिल भरले नाही, तर त्याचे कनेक्शन तोडले जाते. हे शासन दलालांचे पोशिंदे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कामगार नेते कॉ. नरसय्या आडम यांनी वाळवा येथे केले.
येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने शुक्रवारी कॉ. आडम यांना ‘अरुणभैया नायकवडी राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार’ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आयोजित स्मृतिदिन सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी होते.
व्यासपीठावर भगवान पाटील, जयवंत अहिर, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, शिराळा पंचायत समिती सदस्य प्रा. बाळासाहेब नायकवडी, जि. प. सदस्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, सपना मोरे, पं. स. सदस्या वैशाली जाधव, उपसरपंच अपर्णा साळुंखे, पं. स. सदस्य आशिष काळे, नीलावती माळी, आरपीआयचे अरुण कांबळे, सरपंच गौरव नायकवडी प्रमुख उपस्थित होते.
कॉ. आडम म्हणाले की, शेतकऱ्याला या देशात कधी न्याय मिळणार आहे? कारखानदार, व्यापारी, चारचाकीवाले यांना शासन सवलती देते, मग शेतकऱ्यांनाच का सवलती दिल्या जात नाहीत? शेतकरी एकदा का जर संघटित झाला, तर तुम्ही जागेवर सुध्दा राहणार नाही. शेतकऱ्याला ६५ वर्षांनी पाच हजार रुपये मिळतात, पण आमदाराची पाच वर्षे पूर्ण झाली की, त्याला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळते.
त्याच्या पश्चात पत्नीला २५ हजार रुपये मिळतात, तिच्यानंतर मुला-मुलींना पेन्शन मिळते. त्यांची अखंड पिढीच्या पिढी सरकारी पैशावरच पोसली जाते. परंतु शेतकऱ्यांचे काय? राज्यकर्त्यांनो धोरणे बदला, अन्यथा आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सांगितलेल्या मार्गाने जावे लागेल व तुमच्या छाताडावर बसावे लागेल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले की, कॉ. आडम यांच्या रस्त्यावरच्या लढाईला नवनवे नेतृत्व दिल्यास निश्चितच यश येईल.
हुतात्मा किसन अहिर, नाना पाटील यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर अरुणभैया नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पांजली वाहिली. प्रा. राजा माळगी यांनी प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन केले. प्रा. जे. पी. कांबळे, प्रा. हाशिम वलांडकर यांनी सूत्रसंचालनकेले. प्रा. मधुकर वायदंडे यांनी आभार मानले.
यावेळी नजीर वलांडकर, व्ही. डी. वाजे, विठ्ठल चौगुले, संजय होरे , गंगाराम सुर्यवंशी, विलास गुरव, शंकर जाधव, बी. टी. थोरात, बबन हवलदार, दिलीप पाटील, यशवंत बाबर, बाळासाहेब पाटील, अजित वाजे उपस्थित होते. (वार्ताहर)
विडी कामगारांच्या मुलांसाठी एक लाख
कॉ. नरसय्या आडम यांनी पुरस्काराच्या २५ हजाराच्या रकमेत स्वत:च्या आमदार पेन्शनमधून मिळणारे ७५ हजार रुपये घालून एक लाख रुपये सोलापूरच्या विडी कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देत आहे, असे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Web Title: Governance of the capitalist broker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.