शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस शासनाची मान्यता
By admin | Published: January 18, 2015 11:46 PM2015-01-18T23:46:28+5:302015-01-19T00:29:04+5:30
चिंचणीमध्ये जल्लोष : शांताराम कदम यांचा पुढाकार
कडेगाव : चिंचणी-वांगी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायत चौकात हनुमान सोसायटीच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून ही मान्यता देण्यात आली. यामुळे चिंचणी व परिसरातील शिवप्रेमी ग्रामस्थांनी जल्लोष केला. सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या पुढाकाराने या कामास प्रारंभ झाला आहे.शांताराम कदम यांनी स्वत: छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीसाठी पुढाकार घेतला. चिंचणीसह संपूर्ण तालुक्यातून ४० लाखांची लोकवर्गणी जमा करण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर येथील पॉवर ग्रीड कार्पोरेशन या कंपनीने चौक सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला. आता ६० लाख रुपये खर्चाचा विकास आरखडा केला आहे.
या आराखड्याप्रमाणे पुतळा उभारणी, चौक सुशोभिकरण, चौथरा बांधणे अशी कामे होणार आहेत. पुणे येथील बी. आर. खेडकर यांनी १० फूट उंचीचा ४ टन वजनाचा अश्वारूढ पुतळा साकारला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पारंपरिक शिवजयंतीदिवशी या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. चिंचणी परिसराच्या वैभवात भर पडणार आहे. यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
लाल किल्ल्यावरून शिवज्योत आणणार
दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून शिवज्योत चिंचणी येथील ग्रामपंचायत चौकात आणण्याचा संकल्प येथील शिवप्रेमी तरुणांनी केला आहे. यासाठी तरुणांची जय्यत तयारी सुरू आहे. अक्षय तृतीयेदिवशी उद्घाटन समारंभावेळी ही शिवज्योत चिंचणीत पोहोचणार आहे.