सरकारी बाबूंचा सुट्ट्यांचा मूड संपेना ! जिल्हा परिषदेत सोमवारीदेखील कर्मचारी निवांतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:39+5:302020-12-30T04:34:39+5:30
सांगली : या आठवड्यात ख्रिसमससोबत मिळालेल्या सलग तीन सुट्ट्या आणि पाठोपाठ ३१ डिसेंबरचे वेध यामुळे जिल्हा परिषदेचे कर्मचारी ...
सांगली : या आठवड्यात ख्रिसमससोबत मिळालेल्या सलग तीन सुट्ट्या आणि पाठोपाठ ३१ डिसेंबरचे वेध यामुळे जिल्हा परिषदेचे कर्मचारी अजूनही सुट्टीच्या मुडमध्येच असल्याचे दिसून आले. सोमवारी (दि. २८) सकाळी मुख्यालयास भेट दिली असता अनेक कार्यालये निम्म्याहून रिकामीच दिसली. खुद्द काही विभाग प्रमुखही साडेअकरा वाजले तरी कार्यालयात उपस्थित नव्हते.
२५ डिसेंबररोजी नाताळ, त्यानंतर चौथा शनिवार व पाठोपाठ रविवार अशी सलग चार दिवसांच्या शासकीय सुट्टीमुळे सरकारी बाबुंची चंगळ झाली. पण त्यापैकी अनेकांची चंगळ सोमवार उजाडला तरी आटोपली नसल्याचे दिसून आले. कार्यालयीन कामकाज सुरु होण्याची वेळ संपल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांचे आगमन सुरुच होते. दुचाकीवरुन भरधाव येऊन पार्कींगमध्ये जागा मिळविण्यासाठी धावाधाव सुरु होती.
आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्याण, बांधकाम, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, ग्रामिण पाणीपुरवठा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामान्य प्रशासन आदी कार्यालयातील बरीच टेबले आकरा वाजले तरी रिकामी होती. तुलनेने प्राथमिक शिक्षण विभाग मात्र भरगच्च दिसत होता. काही विभागातील कर्मचारी भागात फिरतीवर गेल्याचे सांगण्यात आले तर काही विभागात मनुष्यबळ नसल्याने टेबले रिकामी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. काही विभाग प्रमुख स्वत:च कार्यालयात उपस्थित नव्हते. यामुळे सोमवार उजाडला तरी सरकारी बाबुंचा सुट्टीचा मुड संपला नसल्याचे आढळले.
विभागप्रमुखही निवांतच
काही विभागांचे प्रमुखही साडेआकरा वाजले तरी कार्यालयात उपस्थित नव्हते. एक विभागप्रमुख जीने चढताना आढळले. काही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. ग्रामिण पाणीपुरवठा, बांधकाम, माध्यमिक शिक्षण, आरोग्यसह काही विभागांच्या प्रमुखांनी मात्र वेळेचे प्रकर्षाने भान राखल्याचे दिसले.
तीन लेटमार्क, अर्धी रजा
सामान्य प्रशासन विभागात दोघे रजेवर आहेत. कोणीही लेट नाही. सामान्यत: तीन लेट मार्क मिळाल्यास एक अर्धी रजा टाकली जाते. तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतरही विशेष रजा नाहीत. कर्मचारी वेळेवर आहेत. अन्य विभागातही योग्य कार्यवाही होईल -राहूल गावडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी