शासन संकटातील शेतकऱ्यांच्या पाठीशी
By admin | Published: December 14, 2014 10:34 PM2014-12-14T22:34:43+5:302014-12-14T23:58:29+5:30
दिवाकर रावते : गार्डी परिसरातील अवकाळीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी
विटा : गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने राज्यात द्राक्षांचे सुमारे दोन ते तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून माहिती संकलित करीत आहोत. या पाहणी दौऱ्यानंतर नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येईल, असे सांगून आम्ही आता राज्याच्या सत्तेत असलो तरी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या नैसर्गिक संकटात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
खानापूर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी मंत्री रावते यांनी आज रविवारी केली. यावेळी त्यांनी गार्डी परिसरात नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत आ. अनिल बाबर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, तालुकाप्रमुख संजय विभुते, उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, बजरंग पाटील उपस्थित होते. यावेळी मंत्री रावते यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.
त्यावेळी आ. अनिल बाबर यांनी मंत्री रावते यांना आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ सहन केला. गेला खरीप हंगाम पावसाच्या उशिरा आगमनाने हाती लागला नाही. आता रब्बी पिकांची आशा धरून बसलेले शेतकरी व द्राक्षबागायतदारांचे अवकाळीने मोठे नुकसान केल्याचे सांगितले. त्यामुळे शासनस्तरावर शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. यावेळी मंत्री रावते यांनी नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पिकांचा क्षेत्रनिहाय विमा मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे सांगून पीक विम्याबाबतचे निकष बदलण्यासाठी विचार सुरू आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाईची रक्कम मिळाली पाहिजे, असे सांगितले.
यावेळी गार्डी येथील द्राक्षबागायतदार हेमंत बाबर यांनी शेती कर्जाचे प्रोत्साहन अनुदान गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असल्याचे मंत्री रावते यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी रावते यांनी आ. अनिल बाबर यांच्याशी चर्चा करीत हे अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, हेमंत बाबर, शंकर मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)
नेवरीत पाहणी
नेवरी : नेवरी येथील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. त्यांनी ढवळे मळ्यानजीक शेतात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊस, मका या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री रावते यांच्याकडे तालुक्यातील महावितरण, कृषी विभाग या विभागांच्या अनागोंदी कारभाराबाबत तक्रारी केल्या.