व्यापारी संकुलात शासकीय रुग्णालय

By admin | Published: December 5, 2014 10:16 PM2014-12-05T22:16:24+5:302014-12-05T23:19:36+5:30

तासगावातील स्थिती : प्रस्ताव अडकला लाल फितीत; रुग्णांची गैरसोय

Government hospital in the commercial complex | व्यापारी संकुलात शासकीय रुग्णालय

व्यापारी संकुलात शासकीय रुग्णालय

Next

तासगाव : तासगाव येथे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षण केंद्राचे नवे रुग्णालय होण्याचा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याचा परिणाम त्यांच्या बाह्यरुग्ण विभागावरही झाला आहे. रुग्णालयाची उभारणी झाली नसल्याने हा विभागही चार-पाच वर्षापासून तासगाव पाालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एका हॉलमध्ये सुरू आहे. एका सभागृहात प्लायवूडच्या साहाय्याने विभाग करून वेगवेगळे विभाग सुरू असल्याचे चित्र आहे. हा विभाग पहिल्या मजल्यावर असल्याने वृद्धांची मात्र दमछाक होत आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशिक्षण केंद्र तासगावात अनेक वर्षापासून सुरू आहे. प्रसुती रुग्णालय व बाह्यरुग्ण विभाग अशी दोन केंद्रे तासगावकर नागरिकांसाठी १९६७ पासून सेवेत आहेत. हा बाह्यरुग्ण विभाग ज्या इमारतीत सुरु होता, ती खूप जुनी इमारत नगरपरिषदेने नवीन पालिका इमारतीसाठी पाडली. त्या जागेत पालिकेची इमारत बांधण्याचा ठराव यापूर्वीच झाला आहे. ही इमारत आता नसल्याने पालिकेने प्रशिक्षण केंद्राला सिध्देश्वर मार्केटमधील पहिला मजला दिला आहे. या मजल्यावर असणाऱ्या सभागृहात प्रशिक्षण केंद्राचा बाह्यरुग्ण विभाग गेल्या चार वर्षापासून सुरू आहे.
केवळ बाह्यरुग्णच नाही, तर दंत विभाग, लहान मुलांचे विविध रोग प्रतिबंधक लसीकरण, स्त्री विभाग असे विभाग या सभागृहात सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सुमारे ३१ कर्मचारी या केंद्रासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
बऱ्याचदा नागरिकांना हे शासकीय रुग्णालय नेमके कुठे आहे हेच लक्षात येत नाही. जागेअभावी विशेष यंत्रसामग्री बसविणे अवघड आहे. पहिल्या मजल्यावर चढून जावे लागत असल्याने वृध्द रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपासून या केंद्राच्या रुग्णालयात जाऊन उपचार करण्याची सवय नागरिकांना असल्याने अशा परिस्थितीतही ५0 ते ६0 रुग्ण
दररोज उपचार करून घेण्यासाठी येतात. त्यात वृध्दांची संख्या जास्त आहे.
शहरात शासनाचा विभाग सुरू असल्याने बालकांना देण्यात येणाऱ्या पोलिओसारख्या विविध प्रतिबंधात्मक लसींचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे साहजिकच नागरिकांची वर्दळ जास्त आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहयोगी प्राध्यापक, दंतचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षणासाठी येणारे डॉक्टर व इतर कर्मचारी असे ३१ जण या केंद्रासाठी नियुक्त आहेत.
खासगी रुग्णालयाचे वैद्यकीय सेवेचे दर महागल्याने सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाहीत. यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयांचाच सहारा घेणे भाग पडते. अल्प दरामध्ये विविध सेवा, शस्त्रक्रिया, तपासण्या होत असल्याने शहरासह तासगाव नजीक असलेल्या गावांमध्ये रुग्णही येथे येतात. २00८ पासून शासनाकडे अडकलेल्या रुग्णालयाच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्नांची गरज आहे. याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)


रुग्णालयासाठी शासनाकडे पाठपुरावा
मुळातच मिरज शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षण केंद्राचे नवे रुग्णालय तासगाव येथे उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. जागेअभावी अखेर नगरपालिकेला आपल्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका हॉलमध्ये बाह्यरुग्ण विभाग उभारावा लागला आहे. मात्र अनेक रुग्णांना, नागरिकांना याची व्यवस्थित माहिती मिळालेली नसल्याने त्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त आहे. शासनस्तरावर रुग्णालयाच्या बांधकामासाठी नगरपालिकेकडून आम्ही पाठपुरावा करणार आहे. यापूर्वी पालिकेने शासनाला ठरावही दिला आहे. लवकरच पालिकेच्या अन्य विषयांसाठी आम्ही मंत्रालयात जाणारच आहोत. त्यावेळी या रुग्णालयाच्या कामाबाबतचा आग्रह धरण्यात येईल.

Web Title: Government hospital in the commercial complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.