आटपाडीचे शासकीय वसतिगृह अखेर टॅँकरमुक्त
By Admin | Published: December 9, 2014 10:53 PM2014-12-09T22:53:35+5:302014-12-09T23:26:22+5:30
चार वर्षांनंतर पाण्याची सोय : ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत, विद्यार्थ्यांमध्ये समाधान::लोकमतचा दणका
अविनाश बाड :आटपाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात आज मंगळवारी तब्बल चार वर्षांनंतर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आठवड्यातून येणाऱ्या टॅँकरवर विद्यार्थी अवलंबून राहिल्याने कायमच्या पाणीटंचाईने वैतागून गेले होते. आता पुजारवाडी (आटपाडी) ग्रामपंचायतीने मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे आता पाण्याअभावी बंद पडलेली सौरऊर्जा यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
माणगंगा साखर कारखान्याजवळ कौठुळी फाट्यावर समाज कल्याण विभागाने मुलांसाठी आणि मुलींसाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्चून वसतिगृह बांधले आहे. आटपाडीपासून सुमारे ३ कि. मी. अंतरावर असलेल्या या वसतिगृहात पाण्याची कसलीही सोय नसल्याने पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मागविला जायचा. टॅँकरचालक जिथून शक्य असेल तेथून आणि उपलब्ध होईल तसले पाणी आणून ओतायचा. उघड्यावर ठेवलेल्या टाकीत टॅँकरचे पाणी सोडल्यावर पिण्यासाठी, अंघोळीसाठी पाणी वापरताना, पुरविताना विद्यार्थ्यांची कसरत सुरू होती. ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. मुलांनीही पाण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त दीपक घाटे यांनी भेट दिली आणि वसतिगृहातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पाणीटंचाई संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गरम पाणीही मिळणार!
मुलांना अंघोळीसाठी गरम पाणी देण्यात यावे, यासाठी वसतिगृहाच्या छतावर मोठी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. ४ वर्षे पाण्याअभावी ही यंत्रणा बंद आहे. आता वरच्या टाकीत पाणी सोडून ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर वसतिगृहाच्या स्नानगृहातील ‘शॉवर’ला गरमा-गरम पाणी येणार आहे.