नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आता शासनाचे विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:59+5:302021-05-06T04:27:59+5:30
विटा : कोरोना काळात काम करताना मृत्यू झाल्यास राज्यातील नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने विमा कवच देण्याचा निर्णय घेतला असून, ...
विटा : कोरोना काळात काम करताना मृत्यू झाल्यास राज्यातील नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने विमा कवच देण्याचा निर्णय घेतला असून, नगरपरिषद कर्मचारी संघटनेने केलेल्या विविध मागण्या नगरविकास मंत्रालयाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे राज्यात करण्यात आलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष अनिल पवार यांनी दिली.
राज्यातील ३८५ नगरपालिका व नगरपंचायतीत कार्यरत असणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात इतर विभागाप्रमाणे कुठल्याही विम्याचे सुरक्षा कवच नव्हते. त्यांना कोणताही आधार नसल्यामुळे राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेने दि. १ मेपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यामुळे नगरपरिषद संचनालयाने संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष अनिल पवार, दीपक रोडे, सचिव रामेश्वर वाघमारे, सदस्य अभिजीत गोरे यांच्याशी झूम मीटिंगद्वारे चर्चा केली.
या चर्चेवेळी कोरोना काळात काम करणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याला विमा सुरक्षा कवच देण्याचे जाहीर केले आहे, तसेच संघटनेच्या काही प्रलंबित मागण्यांही मान्य झाल्या असल्याचे पुणे विभागीय अध्यक्ष अनिल पवार यांनी सांगितले.