नागपंचमीसाठी शासकीय यंत्रणा, शिराळकर सज्ज, मिरवणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:30 PM2018-08-14T17:30:51+5:302018-08-14T17:36:12+5:30
शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत.
विकास शहा
शिराळा : शिराळा येथे दि. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी सणासाठी शिराळकर आणि शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत.
शहरातील प्रत्येक मार्गावर स्वागत फलक झळकले आहेत. नाग मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील प्रमुख मार्गावर स्वागत कमानी, स्वागत फलक लावणे, तसेच मिरवणुकीच्या वाहनांच्या सजावटीसाठीची तयारी करीत आहेत.
नगरपंचायतीमार्फत शहरातील रस्ते, गटारी, नाग स्टेडियम याची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. जलजन्य साथ उद्भवणार नाही व साथ उद्रेक होणार नाही याची दक्षता, पथदिव्यांची दुरुस्ती, मिरवणूक मार्ग तसेच भाविकांसाठी मार्गदर्शक फलक लावणे ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलीस ठाणे, अंबामाता ट्रस्ट यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. अंबामाता मंदिर ट्रस्टमार्फत भाविकांच्या दर्शनासाठी तसेच मंदिर आवारातील नियोजन चालू आहे.
एसटी महामंडळामार्फत शिराळा आगाराच्या ७६, तसेच इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, पुणे, मलकापूर आदी ठिकाणच्या जादा बसेसची व्यवस्था केली आहे. शिराळा बस स्थानक, नाईक महाविद्यालय, मांगले फाटा, पाडळी नाका या ठिकाणी बस थांब्याची सोय केली आहे.
पोलीस विभागाकडून एक जिल्हा पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक विभागीय पोलीस अधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस फौजदार, ३६५ पोलीस, ६५ महिला पोलीस, ५० वाहतूक पोलीस, १२ ध्वनी मापक पथके, २० कॅमेरे, चार दंगल नियंत्रण पथके, ५ साध्या वेशातील अधिकारी, ३० साध्या वेशातील कर्मचारी, घातपातविरोधी एक पथक, एक श्वानपथक असा बंदोबस्त ठेवला आहे.
नाग स्टेडियमवर मिनी एस्सेल वर्ल्डची तयारी सुरू असून पाळणे, मेरी गो राउंड, मिठाई, खाद्यपदार्थ स्टॉल, हॉटेल्स, विविध प्रकारच्या वस्तूंचे विक्री स्टॉल सजले आहेत.