सरकारला शेतक-यांची नव्हे, उद्योगपतींची चिंता : अण्णा हजारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 10:44 PM2018-01-20T22:44:52+5:302018-01-20T22:45:21+5:30
मागील १५ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या कालावधित माझ्या वस्तूला भाव मिळत नाही म्हणून कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली नाही.
आटपाडी - मागील १५ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या कालावधित माझ्या वस्तूला भाव मिळत नाही म्हणून कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली नाही. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो; पण सरकारला शेतक-यांची नाही, तर उद्योगपतींची चिंता आहे. त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत मोठे आंदोलन करतोय. देशातल्या कुठल्याच तुरुंगात ठेवायला जागा पुरणार नाही, एवढ्या संख्येने आंदोलनात सामील व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केले.
येथील बचतधामच्या मैदानात अण्णा हजारे यांची सभा झाली. ते म्हणाले, अजूनही चिरीमिरी दिल्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत. शेतकºयांची झोपडी बदलत नाही आणि दलालांनी मात्र २० मजले बांधले. देशात सर्वत्र ‘माल खाये मदारी आणि नाच करे बंदर’! अशी स्थिती आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ राज्याच्या कृषीमूल्य आयोगाला शेतक-यांच्या मालाचा भाव कळवितात. ते केंद्र शासनाच्या कृषीमूल्य आयोगाला कळवितात. तिथे त्यामध्ये ४० टक्के कपात केली जाते म्हणून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. हे थांबले पाहिजे. आम्ही शेतकºयांचा जेवढा खर्च होतो, त्याच्या दीडपटीने भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
पीक कर्जाला बँका चक्रवाढ व्याज लावतात. काही बँका सावकारापेक्षा अधिक २४ टक्के व्याज लावतात. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, शेतकºयांना पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावायचे नाही. १९७२ पासून आतापर्यंत ज्या-ज्या बँकांनी असे व्याज लावले त्या शेतकºयांना परत द्या. कायदा मानत नाहीत, कुणी विचारत नाही म्हणून त्यांचे फावते आहे.
आपल्या घटनेमध्ये प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्याचे पालन करा. ज्यांचे ६० वर्षे वय आहे आणि कुठली आवक नाही त्याला पाच हजार पेन्शन द्या, अशी आमची मागणी आहे. लोकसभेत पेन्शन बिल पडलंय, त्याची अंमलबजावणी करा. आता हालचाली सुरु झाल्या आहेत.
समाजसेविका कल्पना इनामदार म्हणाल्या, राजकर्त्यांनी शेतक-यांचा चेंडू केला आहे. कुणीही येतं लाथ मारतं, जाईल तिकडे जाईल. शेतकºयांच्या प्रश्नांवर राजकारणी आंदोलन करतात; पण शेतकºयांच्या पदरी काहीच पडत नाही. यांनी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल म्हणून वापर सुरू केला आहे.
टेंभूला निधी मिळाला म्हणून अनेकवेळा या भागात नेत्यांची पोस्टर लावली जातात. प्रत्यक्षात पुढे काय होतं? निधी कुठे जातो?
त्यासाठी आता राजकारणविरहित, पक्षविरहित आंदोलन छेडण्याची आणि या लढ्यात प्रत्येकाने सहभाग घेण्याची गरज आहे.
यावेळी राळेगणसिद्धीचे सरपंच राजेश आवटी, संभाजी देशमुख, वीरेंद्र राजमाने, व्ही. एन. देशमुख, आबा सागर यांनी मनोगत व्यक्त केले.