मराठा-ओबीसीत भांडण लावण्याचा सरकारचा डाव, संजय विभुतेंचा आरोप
By अशोक डोंबाळे | Published: September 30, 2023 06:10 PM2023-09-30T18:10:13+5:302023-09-30T18:11:32+5:30
सांगलीत येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सांगली : मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून भांडण लावण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे राष्ट्रीय सदस्य संजय विभुते व अरुण खरमाटे यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला. सरकारचा डाव उधळून लावण्यासाठी मराठा-ओबीसींनी आरक्षणाच्या प्रश्नावर संघटित लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले.
विभुते, खरमाटे पुढे म्हणाले, मराठा समाज कधीही ओबीसीतून आरक्षण मागत नव्हते. अचानक गेल्या महिन्यापासून मराठा समाजाने भूमिका बदलून ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीवरून राज्य सरकारला ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधायचा असण्याची शक्यता आहे. म्हणून ओबीसी आणि मराठा समाजाने आपसात भांडत बसण्यापेक्षा हक्काच्या आरक्षणासाठी सरकारविरोधात लढा उभारण्याची गरज आहे. मराठा समाजाला स्वतंत्र शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याची ओबीसी समाजाने यापूर्वीही मागणी केली आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी संघटनेची भूमिका आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी दि. ३ ऑक्टोबरला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजता उपोषण करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून दि. ३ ऑक्टोबरपासून ओबीसी संवाद यात्रा निघणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या मागण्यासाठी ओबीसींचा एल्गार
- ओबीसीची बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करा
- ओबीसीमधून धनगर, कोळी व वडर समाजाला त्यांच्या हक्काप्रमाणे त्यांना एसटीमध्ये आरक्षण द्यावे.
- मराठा समाजाला केंद्र व राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्या
- मुस्लीम व अल्पसंख्याक समाजाला संरक्षण द्यावे
- लोकसभा व विधानसभेत ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे
- ओबीसी क्रिमिलेअर दाखल्याची अट रद्द करा