पगार शासनाचा, अन् तिघा अधिकाऱ्यांनी सांगलीत थाटले खासगी रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:32 PM2023-01-11T15:32:46+5:302023-01-11T15:33:17+5:30

पशुवैद्यकीय आयुक्त करणार चौकशी

Government salary, and three officials set up a private hospital in Sangli | पगार शासनाचा, अन् तिघा अधिकाऱ्यांनी सांगलीत थाटले खासगी रुग्णालय

पगार शासनाचा, अन् तिघा अधिकाऱ्यांनी सांगलीत थाटले खासगी रुग्णालय

Next

सांगली : लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्यासाठी काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे चांगले प्रयत्न चालू आहेत; पण काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्यापेक्षा स्वत:च्या खासगी प्रॅक्टिसमध्ये व्यस्त आहेत. शासकीय पगार घेऊन तीन पशुवैद्यकीय डॉक्टरांनीसांगलीत रुग्णालय सुरु केले आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपालकांची लूट होत आहे, असा आरोप कुपवाड येथील पशुपालकांनी शासनाकडे तक्रारीद्वारे केला.

जिल्ह्यात लम्पी त्वचारोग जनावरांची संख्या १७ हजार २५४ झाली आहे. लाखमोलाच्या जनावरांचा मृत्यू पाहून पशुपालक चिंतेत आहेत. पशुधन वाचविण्यासाठी काही पशुवैद्यकीय अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत; पण काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्याऐवजी शासनाचा लाखो रुपयांचा पगार घेऊन स्वत:चे रुग्णालय चालविण्यातच ते व्यस्त आहेत. मिरज तालुक्यात कार्यरत असणाऱ्या काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगलीत एक रुग्णालय सुरु केले आहे. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात कमी आणि ते स्वत:च्या खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयात जास्त दिसत आहेत. 

याच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तीन दिवसापूर्वी कुपवाड येथील गायीवर उपचार केले आहेत. पहिल्या शस्त्रक्रियेसाठी १५ हजार रुपये आणि त्यानंतर औषध उपचाराचा वेगळा खर्च घेतला आहे. यातूनही त्या गायीचे आरोग्य खालावल्यामुळे संबंधित पशुपालकांनी शासनाकडे त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीची पशुवैद्यकीय विभागाकडून चौकशी चालू झाली आहे.

पशुवैद्यकीय आयुक्त करणार चौकशी

मिरज तालुक्यातील शासकीय सेवेतील तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालय सुरु केले आहे. या तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल राज्याचे पशुवैद्यकीय आयुक्तांकडे तक्रार गेली आहे. यामुळे पशुवैद्यकीय आयुक्तांनीही संबंधित तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे.

Web Title: Government salary, and three officials set up a private hospital in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.