आंबेडकर स्टेडियमला शासनाने निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:56+5:302021-03-26T04:25:56+5:30
सांगली : शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे क्रीडांगण असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या विकासासाठी शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणी ...
सांगली : शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे क्रीडांगण असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या विकासासाठी शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक सागर घोडके यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
जयंत पाटील यांना भेटून त्यांनी आंबेडकर स्टेडियमच्या विकासाबाबत चर्चा केली. जयंत पाटील यांना त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे क्रीडांगण मोठे असले तरी, या क्रीडांगणाच्या विकासासाठी अद्यापही कोणतीही ठोस पावले अथवा निधीची तरतूद केली गेलेली नाही. सध्या विविध खेळांसाठी ‘छत्रपती शिवाजी स्टेडियम’ हे एकमेव क्रीडांगण उपलब्ध आहे. या क्रीडांगणावर दिवसेंदिवस खेळाडूंची व नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हे क्रीडांगण अपुरे पडत आहे. खेळाडूंची गैरसोय निर्माण होत आहे.
शहरातील विकासापासून दुर्लक्षीत असणारे आंबेडकर स्टेडियम विकसीत करण्याबाबत शहरातील खेळाडूंची व नागरिकांची मागणी होत आहे. परंतु, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता क्रीडांगणाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद होणे कठीण आहे. त्यामुळे शासनामार्फत या क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाल्यास शहरातील खेळाडूंची गैरसोय दूर होईल व विविध खेळांना चालनाही मिळेल.