केशकर्तन व्यावसायिकांना शासनाने मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:42+5:302021-04-08T04:27:42+5:30
सांगली : नाभिक समाजातील केशकर्तन व्यवसाय करणाऱ्यांचे हातावर पोट आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे हाल सुरू आहेत. गेले वर्षभर व्यवसायावर परिणाम ...
सांगली : नाभिक समाजातील केशकर्तन व्यवसाय करणाऱ्यांचे हातावर पोट आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे हाल सुरू आहेत. गेले वर्षभर व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच सलून व पार्लर व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी नाभिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. स्वाभिमानी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती देवकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी यांना सदर निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून सलून व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद होती. आर्थिक कर्जबाजारीपणामुळे राज्यातील १७ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदाही आता पहिला फटका सलून व्यावसायिकाना बसत आहे. त्यामुळे आणखी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य शासनाने सलून व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. गेल्या वर्षीही कोणतीही मदत करण्यात आली नाही, यंदाही मदत दिली नाही तर व्यावसायिकांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यामुळे आर्थिक पॅकेज द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी नितीन कोष्टी, सचिन काशीद, बंडू कोरे, सुनील तुळसे आदींसह सलून व्यावसायिक उपस्थित होते.