शासनाने शिक्षण क्षेत्रास मदत दिलीच पाहिजे

By admin | Published: February 15, 2016 11:37 PM2016-02-15T23:37:46+5:302016-02-16T00:16:58+5:30

शरद पवार : आष्ट्यात डांगे शैक्षणिक संकुलातील अद्ययावत इमारतींचे उद्घाटन

Government should provide help to the education sector | शासनाने शिक्षण क्षेत्रास मदत दिलीच पाहिजे

शासनाने शिक्षण क्षेत्रास मदत दिलीच पाहिजे

Next

इस्लामपूर : ज्ञानसंपादनानंतर जगाच्या पाठीवर कोठेही जाऊन कर्तबगारी सिध्द करता येते, हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेकांनी सिध्द करुन दाखवले आहे. त्यामुळे नवी पिढीही अधिक ज्ञानी बनली पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने शिक्षण क्षेत्राला भरीव मदत करण्याची भूमिका घेतलीच पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संकुलातील आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयाची नूतन इमारत, अद्ययावत जिम, अण्णासाहेब डांगे मुलांचे वसतिगृह, मातोश्री सुभद्रा डांगे मुलींचे वसतिगृह, अभियांत्रिकीची विस्तारित इमारत अशा प्रकल्पांचे उद्घाटन खासदार पवार, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते झाले. याच कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच अण्णासाहेब डांगे यांच्या ‘उमजलं का?’ या पंधराव्या ग्रंथाचे आणि डॉ. प्रताप पाटील यांच्या ‘सहकारी जगत’ या पुस्तकाचे प्रकाशनही पवार यांच्याहस्ते झाले.
पवार म्हणाले की, अण्णांच्या रांगडेपणाला दूरदृष्टीची आणि कलात्मक कौशल्याची किनार लाभल्याचे, हा परिसर पाहिल्यानंतर लक्षात येते. सध्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक स्वरूप आले असताना, येथे गुणवत्तेचा आग्रह धरला जातो, हे प्रशंसनीय आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या शेतजमीन कमी होत आहे. देशातील ८१ टक्के शेतकरी चार-पाच एकर शेतीचे मालक राहिले आहेत. त्यातील ६0 टक्के शेती जिरायत आहे. त्यामुळे फक्त शेतीवर कुटुंबाची उपजीविका परवडणारी नाही. शेतीवरचा हा भार कमी करण्यासाठी ज्ञानाची कवाडे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही खुली झाली पाहिजेत. त्यामुळे शिक्षणाचा विस्तार करताना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांना केंद्र व राज्य शासनाने मदतीचे धोरण ठेवले पाहिजे.
हरिभाऊ बागडे म्हणाले की, अण्णासाहेब डांगे, अ‍ॅड. राजेंद्र डांगे यांनी शिक्षण क्षेत्रातील आदर्श संकुल उभे केले आहे. खासगी क्षेत्रातील चांगल्या संस्था उभारताना शासनाच्या शाळा बंद पडता कामा नयेत याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे.
प्रा. राम शिंदे, आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांचेही भाषण झाले. अण्णासाहेब डांगे म्हणाले की, धंदेवाईकपणाला थारा न देता संकटाला धाडसाने तोंड देण्याची क्षमता असणारी विद्वत्तावान पिढी घडवण्याचा ध्यास आहे. सैनिकी पध्दतीचे शिक्षण सक्तीने देताना विद्यार्थ्याला शिस्तप्रिय बनवले जात आहे.
अ‍ॅड. चिमण डांगे यांनी स्वागत केले. ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. संपतराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, भगवानराव साळुंखे, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, सभापती रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, नीता केळकर उपस्थित होते.
कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, प्राचार्य ए. एम. मुल्ला, उपप्राचार्य डॉ. एल. वाय. वाघमोडे, डॉ. एम. डी. सांगळे, नगरसेवक चंद्रकांत पाटील, प्राचार्य डॉ. प्रमोद बुद्रुक, प्राचार्य सुभाष पाटील, दीपक अडसूळ, सुनील शिणगारे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)


मृत्युंजयी सत्कार : अण्णासाहेब डांगे

शरद पवार सध्या वयाच्या पंच्याहत्तरीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अमृतमहोत्सवाचे विविध कार्यक्रम झाले. पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी यापुढे सत्कार स्वीकारणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी पवारांच्या आयुष्यातील मर्मस्पर्शी प्रसंगांना हात घालत, तीन वेळा मृत्यूलाही हुलकावणी देणारे पवार साहेब मृत्युंजयी ठरले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा मृत्युंजयी सत्कार करणार आहोत, असे सांगत, गांधी प्रतिमा आणि पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार केला. सोमवारीच वाढदिवस असणाऱ्या विलासराव शिंदे यांच्यासह वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आमदार जयंत पाटील यांनाही सत्काराच्या रेशीमबंधनात गुंफून टाकले.

Web Title: Government should provide help to the education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.