वीज बिलासाठी सरकारने पाणी योजना बंद पाडल्या
By Admin | Published: January 10, 2017 11:08 PM2017-01-10T23:08:19+5:302017-01-10T23:08:19+5:30
शशिकांत शिंदे : सावळजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा
तासगाव : आमचे सरकार असताना सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना टंचाई निधीतून पाणी योजनांची वीजबिले, पाणीपट्टी भरुन पाणी दिले. परंतु भाजप सरकारला तेवढेही जमत नाही. त्यांनी आबांच्या काळात झालेल्या विसापूर, पुणदी, आरफळ, म्हैसाळ योजना वीज बिलासाठी बंद पाडल्या, अशी टीका माजी जलसंपदामंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. या योजना शेतकऱ्यांकडून पैसे न घेता चालू करुन दाखवाव्यात, असे आव्हानही त्यांनी सावळज (ता. तासगाव) येथे दिले.
सावळज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शेतकरी मेळावा झाला. आमदार सुमनताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी आमदार शिंदे म्हणाले, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील पाणी योजना सुरू करण्यासाठी कधीही शेतकऱ्यांकडे पैशासाठी तगादा लावत नव्हते. याउलट शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाच्या निधीतून पाणी योजना सुुरू ठेवण्यास भाग पाडत होते. आताचे हुकूमशहा सरकार मात्र वीजबिल, पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी सोडत नाही. नोटाबंदीमुळे सामान्य जनता वैतागली आहे. येथील शेतीला पाणी नाही, शेतीमालाला दर नाही, तरुणांना नोकरी नाही, गुन्हेगारी वाढत आहे, अशी अवस्था भाजप सरकारची आहे. मात्र आम्ही तुम्हाला पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तीव्र आंदोलन करुन या भागाला पाणी मिळवून देऊ.
माजी सभापती चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप सरकार मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ करते, मात्र शेतकऱ्यांना वीजबिल, कर्जमाफी देत नाही. बिलासाठी पाणी योजना बंद ठेवल्या जातात. राजकीय अडथळे आणून तालुक्यातील एमआयडीसी नामंजूर करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्रेहल पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, दीपक उनउने, राजू सावंत, वसंत सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)