निवडणुकीनंतर सरकार पडेल
By admin | Published: February 15, 2017 10:46 PM2017-02-15T22:46:38+5:302017-02-15T22:46:38+5:30
पतंगराव कदम : कार्वे येथे काँग्रेसची सभा; दोन्ही कॉँग्रेसने चुका पोटात घातल्या
कार्वे : ‘कार्वे हा मतदारसंघ यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते व संभाजीबाबा यांचा आहे. हे तिघे आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिले; पण आता सातारा जिल्ह्यात कोण कुठं उड्या मारतंय. चंद्रकांतदादा पाटील अनेकांना प्रवेश देताहेत. वाल्याचे वाल्मिकी करत प्रवेश दिला जात आहे. पण काँग्रेस आघाडीचं सरकार आलं की पुन्हा ही मंडळी परत येतील. मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजप व शिवसेनेची ताणाताणी पाहता निवडणुकीनंतर सरकार पडेल,’ असे असे प्रतिपादन आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
कार्वे, ता. कऱ्हाड येथे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव ऊर्फ बंडानाना जगताप, सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कृष्णेचे संचालक अशोकराव जगताप, माजी संचालक शिवाजीराव जाधव, माणिकराव जाधव, नगरसेविका स्मिता हुलवान, वडगाव हवेलीचे माजी सरपंच दिलीप चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, माजी उपसरपंच संभाजीराव थोरात, संतोष पाटील, दुशेरेचे बाबूराव जाधव, उत्तमराव पाटील, प्रल्हाद देशमुख यांच्यासह उमेदवार पुष्पाताई ठावरे, वनिता जाधव, अनिता गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार कदम म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पन्नास वर्षांनी पृथ्वीराजबाबांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने मागील सर्व
चुका पोटात घातल्या आहेत. हे दोन्ही पक्ष येथूनपुढे समविचारी
पक्षांना बरोबर घेऊन एकत्रपणे चालतील.’
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर डावा विचार जपला. काँग्रेसमध्ये राहूनही डावा विचार जोपासला; पण त्यांच्या घरातून त्या विचाराविरोधात काम करणारी मंडळी पाहून दु:ख होत आहे. जनतेने देशात व राज्यात सत्ता बदलावेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे.’
आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘माझ्यावर पदे स्वत: जवळ ठेवल्याचा आरोप काही मंडळी करत आहेत. आरोप करणाऱ्यांनी यशवंतराव मोहितेंच्या विचाराला सोडून भाजपशी संगत का केली, याचे आम्हाला दु:ख आहे. पक्ष व निष्ठा एकच असावी लागते. तरच पदे मिळतात. चंद्रकांतदादांना पृथ्वीराजबाबांनी केलेला विकास दिसत नसेल, तर त्यांना तालुक्यातून एकवेळ फिरवून आणा.’
यावेळी बंडानाना जगताप म्हणाले, ‘अतुल भोसले सांगून आमदार होणार नाहीत. भोसलेंना आयुष्यभर यश मिळणार नाही. ते मदनदादांचा केवळ वापर करतील.’
यावेळी मनोहर शिंदे, अजितराव पाटील, माणिकराव जाधव यांची मनोगते व्यक्त केली. वैभव थोरात यांनी स्वागत केले. युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. शब्बीर मुजावर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
महू चावलेला
पैलवान पळाला...
अजितराव पाटील-चिखलीकर यांनी शेलक्या भाषेत मोहिते व भोसलेंचा समाचार घेतला. मी पृथ्वीराजबाबांना दातासहीत साप खिशात घेऊ नका म्हणून सांगत होतो. पण त्या सापांनी एकवेळ विधानसभेला व आता एकवेळ त्यांचा चावा घेतला. आमच्यातून महू चावलेला पैलवान पळून गेला. असे नाव न घेता त्यांनी मोहिते व भोसलेंचा समाचार घेतला.