सरकार पुरबाधीताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार : विश्वजीत कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 06:23 PM2021-07-29T18:23:39+5:302021-07-29T18:24:43+5:30
Flood Sangli : सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन स्तरावरून पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन स्तरावरून पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
सांगली जिल्ह्यामधील अतिवृष्टी व पुर यामुळे बाधीत झालेल्या पुरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकताच असून जिल्ह्यामध्ये पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नदी काठावरील गावांना यांचा मोठा फटका बसला आहे. यामुळे बाधीत कुटूंबाना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी बाधीतांना देण्यात येणारे सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता, घर व गोठ्यांची झालेली पडझड आदी साठी शासनाच्या नेहमीच्या प्रचलित शासन निर्णयानुसार सुमारे 400 कोटी रुपये एवढ्या अनुदानाची आवश्यक असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलेला आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांच्या मार्फत रितसर प्रस्ताव उपलब्ध करुन घेवून निधीची उपलब्धता करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.
जिल्ह्यामध्ये सध्या आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, महावितरण, पाटबंधारे, राष्ट्रीय महामार्ग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषि आदी शासकीय मालकीच्या मालमत्तेचे सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबत शासन स्तरावर निधी उपलब्धतेसाठी डॉ. विश्वजीत कदम यांनी बैठकीत चर्चा केल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी नेहमी पुर येतो, त्या ठिकाणी राहणाऱ्या पुरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुर्नवसन करण्यासाठी शासनाने योजना तयार करावी अशी विनंती डॉ.कदम यांनी केली असून मुख्यमंत्री यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ.विश्वजीत कदम यांनी सांगितले.
याचबरोबर शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत ही एन.डी.आर.एफ. व एस.डी.आर.एफ. यांच्या निकषाप्रमाणे देण्यात येते. पुरामुळे झालेल्या हानीचे प्रमाण फार मोठे असून बाधीत कुटूंबांना आधार देण्याची आवश्यकता असून महाविकास आघाडीचे सरकार सांगली जिल्ह्यातील पुरबाधीत जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील संपुर्ण पूरबाधीत गावांचा दौरा करुन पाहणी केल्याची माहीती यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे.