दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावलं कासवगतीनं : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:36 PM2019-05-12T23:36:46+5:302019-05-12T23:36:59+5:30

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच ...

Government's decision on drought-related issues: Sharad Pawar | दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावलं कासवगतीनं : शरद पवार

दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावलं कासवगतीनं : शरद पवार

googlenewsNext

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, बारामती अ‍ॅग्रोचे प्रमुख रोहित पवार, संजय शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज पोळ, कविता म्हेत्रे, उपनराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मनोज
पोळ, बाळासाहेब सावंत, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, पिंटू तावरे, आदी प्रमुख उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा होतोय. तो अधिक व्हावा यासाठी बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आता दुष्काळी गावांना भेटी दिल्या. त्यावेळी लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. या भागाला दुष्काळ नवीन नाही; पण आताचे संकट मोठे आहे. त्यावेळेचा दुष्काळ आणि आताचा दुष्काळ वेगळा आहे. यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न आहे.’
‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेऊन उपाययोजना लगेच सुरू केल्या जात होत्या; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील बाधित गावांना किती टँकरची गरज आहे, त्या प्रमाणात टँकरची संख्या नाही. अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली आहेत. तालुक्यातील पाणी स्रोत संपू लागलेत. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आहेच,’ असेही पवार यांनी सांगितले.
दुष्काळाचे राज्यात संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी या संकटप्रसंगी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

चौकट :
पैसे मिळाले नसल्याचे सांगितले...
राज्यातील दुष्काळाची पाहणी करून या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला भेटून अजून काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे सांगणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पवार यांनी तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसानभरपाई मिळाली का ? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.

असा राहिला माण दौरा...
शरद पवार हे रविवारी माण तालुका दौºयावर होते. ते सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. आल्यानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास बिजवडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर शिंदीमध्ये पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून महाश्रमदानाच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर वावरहिरे येथे ग्रामस्थांशी रोजगार, चारा आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात संवाद साधला. या ठिकाणाहून भालवडी येथील चारा छावणीस भेट देण्यासाठी ते गेले. तेथे पशुपालकांबरोबर चर्चा करून मार्डीतील वाळलेल्या डाळिंंब बागेची पाहणी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भोजन केले. यानंतर पवार यांनी पानवण येथे पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथून पवार यांचे म्हसवड येथे आगमन झाले. या ठिकाणी बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रारंभ करत नागरिकांशी संवाद साधला. हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचनंतर त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले.

Web Title: Government's decision on drought-related issues: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.