दुष्काळी प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: January 22, 2016 12:56 AM2016-01-22T00:56:38+5:302016-01-22T01:05:06+5:30
सुप्रिया सुळे : उमदीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; विविध विकास कामांचे उद्घाटन
उमदी : दुष्काळी प्रश्नांकडे राज्य शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष असून, ‘कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र’, असा प्रश्न त्यांना विचारावा लागणार आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी जत तहसील कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.उमदी येथील उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे यांच्या झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर उपस्थित होत्या. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांच्याहस्ते ‘आधार’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खा. सुळे म्हणाल्या, दुष्काळी समस्या सोडविण्यासाठी सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याच्या निषेधार्थ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. याची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्यावर त्यांनी सोपविली. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी जिल्ह्याचा विकास केला आहे. यावरुन शरद पवार यांचे महिला धोरण यशस्वी झाल्याचे सिध्द होते. यापुढेही कारभार महिलांच्या हाती आल्यास कामे निश्चितच चांगली होणार आहेत. सत्तेचे विकेंद्रीकरण अत्यंत गरजेचे आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत दुष्काळी समस्या, म्हैसाळ योजनेचे पाणी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटून चर्चा केलेली आहे, असे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुष्काळी जतच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही खा. सुळे यांनी दिली.
सरकारची सत्तेपूर्वीची आणि आताची भाषणे यात खूप फरक आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्यांना तुम्हीच पहा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सध्याचे सरकार अडचणीत सापडले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे यात महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. सध्या मात्र तिसऱ्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र आहे.
आ. जयंत पाटील म्हणाले की, सरकारचे डोळे दुष्काळाबाबत झाकलेले आहेत. हे सरकार दुष्काळी प्रश्न सोडविणार का? असा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जत तहसील कार्यालयावर दुष्काळी प्रश्नांसाठी मोर्चा काढणार आहोत.
आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, जत तालुक्याला दुष्काळ पाचवीला पूजलेला आहे. म्हैसाळ योजना सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जर मागून मिळत नसेल, तर हिसकावून घेऊ .
यावेळी राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या मोहिनी चव्हाण व आशाराणी इम्मन्नवर यांचा सत्कार खा. सुळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक अॅड. चन्नाप्पान्ना होर्तीकर यांनी केले. यावेळी लिंबाजी पाटील, बाबासाहेब मुळीक, गजानन कोठावळे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील, स्मिता पाटील, बसवराज धोंडमल, बाळासाहेब पाटील, पपाली कचरे, अण्णासाहेब गडदे, सिद्धाप्पा शिरसाड, संतोष पाटील, तम्मणगौडा पाटील, नजमा मकानदार, अमृतानंद महास्वामी, रेवाप्पा लोणी, वाहब मुल्ला, फिरोज मुल्ला, उत्तम चव्हाण, पिरसाहेब जमादार, महादेवप्पा होर्ती, निसारभाई मुल्ला आदी उपस्थित होते. (वार्ताहर)