कवठेएकंदच्या गुंडाकडून सांगलीत पिस्तूल हस्तगत-: दहशत माजविण्याचा उद्देश उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:06 PM2019-04-12T13:06:51+5:302019-04-12T13:13:01+5:30
कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा कवठेएकंद (ता. तासगाव) येथील गुंड सुहास सर्जेराव शिरतोडे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे.
सांगली : कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा कवठेएकंद (ता. तासगाव) येथील गुंड सुहास सर्जेराव शिरतोडे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगलीत आयकर भवनजवळ गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. हे पिस्तूल त्याने तासगावमधील गुंड रोहित एकनाथ ऐवळे याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा हत्यार बाळगणाºयांवर, तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गुरुवारी शहरात गस्त घालत होते.
या पथकातील हवालदार बिरोबा नरळे यांना कवठेएकंदमधील गुंड सुहास शिरतोडे हा आयकर भवनजवळ कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एकशे दहा रुपये असा ५० हजार पाचशे दहा रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
शिरतोडे याने हे पिस्तूल कोठून खरेदी केले, याबद्दल चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने काही दिवसांपूर्वी तासगावमधील विटा नाका येथे राहणारा गुंड रोहित आवळे याच्याकडून ते खरेदी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शिरतोडेसह आवळे याच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर गुन्हे दाखल
अटकेतील गुंड शिरतोडे व त्याचा साथीदार ऐवळे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी असे दोन गुन्हे सांगली ग्रामीण पोलिसात नोंद आहेत. ऐवळे याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तासगावला रवाना करण्यात आले आहे.