Sangli Crime: बनावट शपथपत्र तयार करुन मिरजेतील डॉक्टरची जमीन हडप; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:14 PM2023-03-03T16:14:56+5:302023-03-03T16:15:30+5:30
मुख्य संशयितासह दहाजण अद्याप फरारीच
मिरज : मिरजेतील डॉ. सचिन सुगाणावर यांची काळूबाळूवाडी (ता. सांगोला) येथील कोट्यवधी रुपये किमतीची शेतजमीन बनावट शपथपत्राद्वारे हडप केल्याबद्दल सांगोला पोलिसांनी मिरजेतील तिघांना अटक केली. यातील मुख्य संशयितासह फरारी दहाजण सांगली, मिरज परिसरात मोकाट फिरत असल्याची तक्रार डाॅ. सुगाणावर यांनी पोलिसात केली आहे.
डाॅ. सचिन सुगाणावर यांची रत्नागिरी-नागपूर महामार्गालगतची वडिलोपार्जित सुमारे साडेपाच एकर शेतजमीन त्यांचा चुलतभाऊ राहुल सुगाणावर याने बनावट शपथपत्राद्वारे स्वत:च्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुख्य संशयित राहुल कुमार सुगाणावर (रा. ब्राह्मणपुरी, मिरज) याच्यासह त्याची आई, दोन बहिणींसह संबंधित गावचे तलाठी, सर्कल व राहुल सुगाणावर यास मदत करणाऱ्या नऊ नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याच शेतजमिनीवरील लोखंडी अँगल, पत्रे व इतर ५५ लाखांचे साहित्य चोरीचाही गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी आत्तापर्यंत शीतल सुगणावर, अनिकेत सुगाणावर व संजय सुगणावर या तिघांना अटक केली आहे. यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र प्रमुख आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नसल्याने ते पोलिस दफ्तरी फरारीच आहेत. मुख्य संशयित सांगली-मिरज शहरात मात्र मोकाट फिरत असल्याची तक्रार डाॅ. सुगाणावर यांनी केली आहे.