भित्तीचित्रांमधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 04:08 PM2020-01-09T16:08:49+5:302020-01-09T16:13:32+5:30
राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगली : राजवाडा चौकातील भारती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीला समाजप्रबोधनाचे साधन बनविताना विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पकता व कला यांचे अनोखे दर्शन घडविले. विविध सामाजिक विषयांवरील चित्रांनी भिंतींना सजीव केले असून, ही चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगलीच्या भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केली होती. चित्रकलेचे फारसे ज्ञान नसले तरी, कल्पकतेने सुंदर चित्रांना त्यांनी साकारले. पाणी वाचवा, पृथ्वी वाचवा, मुलगी वाचवा, देश वाचवा, बलात्काराची विकृती थांबवा, प्राणी वाचवा, ग्रह वाचवा, दारू पिऊन वाहन चालवू नका, प्रदूषण टाळा, पृथ्वी वाचवा अशा अनेक सुंदर, सामाजिक संकल्पनांना त्यांनी रंग-रेषांच्या माध्यमातून प्रकट केले.
एरवी मावा, पान, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांनी बकाल व मृतवत केलेल्या भिंतींमध्ये जीव ओतून विद्यार्थ्यांनी त्यांना अक्षरश: जिवंत केले. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांशी या भिंती बोलू लागल्या आहेत. समाजप्रबोधनाचे अनोखे अखंड कार्य या भिंतींच्या माध्यमातून सुरू झाले आहे.
विद्यापीठाच्या सभोवताली चारही बाजूंनी कुंपणभिंत आहे. याठिकाणी सर्व विद्यार्थी जमले आणि त्यांनी ही भित्तीचित्राची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी धडपड सुरू केली. काढलेल्या या चित्रांसमवेत सेल्फी काढत त्यांनी शैक्षणिक कार्यातील सुंदर क्षणांना आपल्या कवेत घेतले. समीर खान, रिध्दी शहा, रूमाना सय्यद, कोमल माळी, सुश्रुत पत्की, श्रीधर सुतार आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.