ग्रामपंचायत मैदानात वर्चस्वाची दावेदारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:32 PM2017-09-26T23:32:23+5:302017-09-26T23:32:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागावर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच मोठ्या पक्षांची धडपड सध्या सुरू आहे. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पक्षीय वर्चस्वाचा डंकाही पिटला जाणार आहे. या निवडणुकीत भाजप, राष्टÑवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांची ताकद पणाला लावली असून प्रत्येकाने जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकण्याचा दावा केला आहे.
गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दलची नाराजी ग्रामीण भागातील लोकांमध्ये विशेषत: शेतकºयांमध्ये दिसत आहे. शेतकºयांच्या कर्जमाफी योजनेचा गोंधळही या नाराजीत भर टाकत आहे. अनेक अडचणीतून जिल्ह्यातील शेतकरी प्रवास करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून संवाद साधत असताना शेतकºयांमधून तसेच ग्रामीण जनतेतून नाराजी स्पष्टपणे जाणवत आहे. तरीही केवळ विरोधासाठी विरोधाचे राजकारण न करता, आम्ही गावांच्या विकासाची भूमिका मांडून लोकांसमोर जात आहोत. लोकांनाही काँग्रेसची ही भूमिका पटत आहे. ज्याठिकाणी गावाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित होऊन तडजोडीने बिनविरोध निवडणूक करण्याचा विचार पुढे येत आहे, त्याठिकाणी काँग्रेस बिनविरोधसाठी तयार आहे. लोकांच्या प्रश्नांशी एकरुप होऊन ते सोडविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आमचा पक्ष करणार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आम्ही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी समन्वय राखून काम करीत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगला व सक्षम उमेदवार निवडताना त्याठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मताचा कानोसाही घेतला जात आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमचे नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागात आजही काँग्रेसची ताकद कायम आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे पक्षाकडे आहे. त्यामुळे याच ताकदीच्या बळावर आणि विकासाच्या भूमिकेवर आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकून दाखवू. पक्षाचे सर्वच नेते यासाठी आता राबत आहेत. तालुकानिहाय किंवा गावनिहाय प्रतिस्पर्धी पक्ष व गट बदलत जातात. त्यामुळे आम्ही जिल्ह्यासाठी एकच धोरण न ठेवता, स्थानिक परिस्थितीवर अवलंबून नियोजन करीत आहोत.
ग्रामीण भागातून भाजपबद्दल नाराजी
- सत्यजित देशमुख, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस
गेल्या काही वर्षातील भाजपचा आलेख सातत्याने वर जाणारा आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीपासून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत जनतेने भाजपवरच सर्वात जास्त विश्वास व्यक्त करीत सत्तास्थाने दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील ताकद सिद्ध केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठीही आमची तयारी सुरू आहे. गावपातळीवर स्थानिक परिस्थितीनुसार आघाड्या होणार असल्या तरी, भाजपच्या विचाराचे लोक प्रत्येक ठिकाणी असतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुका पातळीवर नियोजन केले जात आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमधील आमचा समन्वय चांगला आहे. भाजपबद्दल लोकांमध्ये चांगली भावना आहे. केंद्र व राज्यातील सत्तेनंतर आजअखेर अनेक लोकोपयोगी निर्णय आम्ही घेतलेले आहेत. यामध्ये कर्जमाफीचा निर्णय सर्वात महत्त्वाचा आहे. या निर्णयाच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचे अश्रू पुसण्याचे काम सरकार करीत आहे. यापुढेही अशाच लोकोपयोगी व विकासात्मक कारभारासाठी ग्रामपंचायतींच्याही सत्तास्थानी भाजप असेल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. निश्चितपणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येतील. सरपंच पदांच्या शर्यतीतही आमचा पक्ष बाजी मारणार आहे. स्थानिक पातळीवर अनेकांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. येतील त्या सर्व चांगल्या लोकांचे आम्ही स्वागत करीत आहोत. पक्षाची व्याप्ती वाढविताना आम्ही विकासाचे धोरण तेच ठेवले आहे. पक्षांतर्गत कुठेही वाद नाहीत. स्थानिक पातळीवर जर कुठे वाद निर्माण होत असतील, तर ते समन्वयाने मिटविण्याची जबाबदारी तालुका अध्यक्षांना दिली आहे.
ग्रामपंचायतींवरही भाजपचेच वर्चस्व राहणार
- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप