मांजर्डे, विसापूरमध्ये ग्रामपंचायतीचे धुमशान
By Admin | Published: October 13, 2015 10:11 PM2015-10-13T22:11:09+5:302015-10-13T23:58:29+5:30
राष्ट्रवादीला आव्हान : नेत्यांची दमछाक
संजयकुमार चव्हाण - मांजर्डे तासगाव तालुक्यातील व खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील मांजर्डे, विसापूर सर्कलमधील २१ गावांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे आबा-काका गटातील संघर्ष पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळणार आहे.
मांजर्डे, विसापूर सर्कलमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या आबा गटाचे वर्चस्व कायम होते. राष्ट्रवादीचे मोठे रथी-महारथी आबांचे प्रमुख शिलेदार या मतदारसंघात आहेत. परंतु आबांच्या निधनानंतर या पहिल्याच निवडणूक प्रक्रियेला या गटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच खासदार संजयकाकांनी या भागात स्वत: लक्ष घातल्याची चर्चा असल्याने, ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार होतील अशी चर्चा आहे. आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचे जहाज बुडताना दिसत आहे. काही कार्यकर्ते सैरभैर झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे यावेळी प्रमुख नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.
मांजर्डे ग्रामपंचायतीवर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पाटील यांची गेली २० वर्षे निर्विवाद सत्ता आहे. विरोधी गट आजपर्यंत संघर्ष करताना दिसत आहे. यावेळी मात्र खासदार संजयकाकांनी पूर्ण पाठबळ दिले आहे.
या सर्कलमधील राजकीय सूत्रे या गावातूनच हालतात. तसेच भागातील राजकीय महत्त्वाचे निर्णयही याच गावातून होतात. राष्ट्रवादीचे दिनकर पाटील यांनी मागील २० वर्षात बरीच विकासकामे केलेली आहेत. त्याच्या जोरावर यावेळी सुध्दा ते सत्ता घेण्यात यशस्वी होतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भाजपला तालुकास्तरावर एकही पद नसल्याने या गावात भाजपचे नेतृत्व तयार झालेले नाही. विरोधी गट यावेळी काय व्यूहरचना करतो, हे पाहावे लागेल.
प्रतिष्ठेची निवडणूक
खासदार संजयकाकांनी स्वत: लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या परिसरातील सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे असल्याचे चित्र दिसून येत आहे.