ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:32 PM2022-12-24T17:32:24+5:302022-12-24T17:33:12+5:30

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित

Gram panchayat election was held, when will the farmers get incentive subsidy | ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

googlenewsNext

अविनाश कोळी

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अडलेले प्रोत्साहन अनुदान आता निवडणुकीनंतर कधी मिळणार, याची प्रतीक्षा जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना लागली आहे. पहिल्या यादी नंतर दुसरी यादी प्रसिद्ध होण्यास तब्बल दोन महिन्यांचा विलंब लागला आहे. त्यामुळे तातडीने पात्र शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. निवडणूक आचारसंहितेचा फटका कर्जमाफी योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना बसला होता. या शेतकऱ्यांची दुसरी यादी निवड यादी आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली होती. सुमारे दोन महिने या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागली.

शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेची घोषणा केली होती. महापुराचे अनुदान घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना तसेच तीन वर्षात सलग नव्हे तर कोणत्याही दोन वर्षात कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढली असल्याचे दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे विघ्न

दिवाळीनंतर पात्र सुमारे एक लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर होणार होती. यासाठी गेली काही दिवस शेतकरी प्रतीक्षा करीत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दुसरी यादी अडकली. आचारसंहितेच्या काळात लाभार्थ्यांचा कोणताही शासकीय योजनेचा लाभ देता येत नाही. त्यामुळे ही यादी आता ग्रामपंचायत निवडणूक संपल्याने जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

१२६१ शेतकऱ्यांचा फैसला आजही प्रलंबितच

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. यासाठी आवश्यक ती ऑनलाइन सुविधा शासनाने अद्याप उपलब्ध न केल्याने या तक्रारी प्रलंबित आहे.

शेतकऱ्यांना १८५ कोटी रुपयांचे झाले वाटप

अनुदानासाठी जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली होती. त्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला. यातील ५५ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचे १८५ कोटी रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले.

Web Title: Gram panchayat election was held, when will the farmers get incentive subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.