‘कडेगाव’मधील दहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस

By admin | Published: January 21, 2015 10:54 PM2015-01-21T22:54:33+5:302015-01-21T23:51:47+5:30

आरक्षण जाहीर : पतंगराव कदम-पृथ्वीराज देशमुख गट आमनेसामने

Gram panchayat elections in 10 villages in Kathgaon, Churus | ‘कडेगाव’मधील दहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस

‘कडेगाव’मधील दहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस

Next

कडेगाव : तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुका यावेळी काँग्रेस विरुध्द भाजप अशा रंगणार असून, यामध्ये कडेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.सांगली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जुलै, डिसेंबरअखेर संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, कडेगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या १0 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून, कडेगावला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याने येथील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या कडेगाव तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर कडेगाव ग्रामपंचायतीवर १७ पैकी १३ सदस्य सध्या काँग्रेसचे आहेत. त्यामुळे कडेगाववर सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. तशा प्रकारच्या हालचाली सध्या सुरु आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा कडेगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम यांच्याविरोधात तुल्यबळ लढत दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे कडेगावची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरणार आहे. यापूर्वी सतत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र येऊन सत्तेत भागीदारी मिळवत असत. यावेळी असे काही घडणार नाही. राष्ट्रवादीला या निवडणुकीत फारसे काही हाती लागणार नाही, कारण राष्ट्रवादीकडे तुल्यबळ असा नेता नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीनिमित्त माजी आमदार देशमुख व पतंगराव कदम गट आमने-सामने उभे राहणार आहेत. साहजिकच ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरणार आहे.त्यासाठी सध्या दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. शाळगाव परिसरातील ढाणेवाडी, कान्हरवाडी, येतगाव, कोतीजच्या निवडणुका विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण शाळगावच्या नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. सोनहिरा खोऱ्यात रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, येथे भाजपचा कस लागणार आहे. (वार्ताहर)


कडेगावसाठी जोरदार लढत
रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, कडेगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या १0 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कडेगावला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याने येथील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असली तरी, भाजपही वर्चस्वासाठी जोरदार प्रयत्न करेल.

Web Title: Gram panchayat elections in 10 villages in Kathgaon, Churus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.