सांगली जिल्ह्यात भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:03 PM2023-11-07T13:03:44+5:302023-11-07T13:23:19+5:30
सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली ...
सांगली : जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून २७ ग्रामपंचायती मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. काँग्रेस व माजीमंत्री अजितराव घोरपडे गटाने प्रत्येकी सात ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ग्रामीण भागातील अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळविले. शिंदे गटाच्या शिवसेनेने सहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तरमनसेने एक ग्रामपंचायत ताब्यात घेऊन ग्रामीण राजकारणात चंचू प्रवेश केला आहे.
सांगली जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. यामध्ये १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आणि ११ ग्रामपंचायतीचे पॅनेल बिनविरोध झाले आहे. पूर्णतः बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच वगळून उर्वरित ८३ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान रविवारी झाले होते.
राष्ट्रवादीने शिराळा तालुक्यातील २९ पैकी सर्वाधिक १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक, माजीमंत्री शिवाजीराव नाईक आघाडी ग्रामीण मतदाराने स्वीकारल्याचा कौल आहे. वाळवा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यशस्वी ठरले. पण, कारंदवाडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन भाजपने शिरकाव केला आहे. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील माजी सदस्य संभाजी कचरे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.
आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीपैकी नऊ ग्रामपंचायती आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने जिंकल्या. शिवसेना चार आणि स्थानिक आघाड्यांनी चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. जत तालुक्यातील सर्व पाचही ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यशस्वी ठरले. कवठेमहांकाळ तालुक्यातील २० पैकी आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे ठेवण्यात आमदार सुमनताई पाटील यांना यश आले. तसेच सात ग्रामपंचायती खेचून आणण्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यशस्वी झाले आहेत.
कडेगाव तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडे ठेवण्यात माजीमंत्री विश्वजित कदम यांना यश आले आहे. एका ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील चारपैकी काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तासगावमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व राखण्यात खासदार संजय पाटील यशस्वी झाले. खानापूर तालुक्यात दोन ग्रामपंचायती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाकडे तर दोन ग्रामपंचायती भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आहेत.
पक्षीय बलाबल
पक्ष -ग्रामपंचायती संख्या
भाजप -३१
राष्ट्रवादी -२७
काँग्रेस -०७
घोरपडे गट -०७
शिंदे गट शिवसेना -०६
स्थानिक आघाड्या -१६
पालकमंत्र्यांना धक्का
मिरज तालुक्यातील जानराववाडी आणि निलजी बामणी या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आपले पॅनेल उभे केले. त्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्यांच्या पॅनेलला अपयशाला सामोरे जावे लागले. भाजप आणि पालकमंत्री खाडे यांना मोठा धक्का आहे. या दोन्ही गावांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत.
कारंदवाडीत जिप सदस्याचा पराभव
कारंदवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कचरे गट समर्थक आहे.