सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:00 PM2022-11-19T16:00:52+5:302022-11-19T16:01:27+5:30
शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी
अशोक पाटील
इस्लामपूर : वाळवा, शिराळा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यानंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस असा क्रम लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे गटबाजीचे आव्हान आहे. पक्षबांधणीपेक्षा स्वत:चा गट अबाधित ठेवण्यावर स्थानिक नेत्यांचा भर असणार आहे.
वाळवा तालुक्यातील ८८, तर शिराळ्यातील ६० अशा एकूण १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील गटांची बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता आहे. आता माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा गटही राष्ट्रवादीत गेला आहे. स्थानिक पातळीवर या पक्षात गटबाजी आहे. एकेका गावात पक्षांतर्गत तीन-तीन गट कार्यरत आहेत.
भाजपची ताकदही वाढली असली तरी या दोन तालुक्यांतील पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आहे, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे महाडिक गटाचे राहुल व सम्राट महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख आपापले गट मजबूत करून राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. परंतु स्थानिक पातळीवर कोण कोणाकडे जाणार हे निश्चित नसल्याने नेत्यांची दमछाक होणार आहे. भाजप पुरस्कृत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत नेमके कोणाला पाठबळ देणार, हेही गुलदस्त्यात आहे. या दोन्ही पक्षांतील गटबाजीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
शिवसेनेची अवस्था काय?
शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आनंदराव पवार जिल्हाप्रमुख आहेत, तर उद्धव ठाकरे गटाकडे अभिजित पाटील जिल्हाप्रमुख आहेत. पवार यांचा गट शहरात, तर पाटील यांची ताकद ग्रामीण भागात आहे. त्यांचे गट या निवडणुकीपुरते काही ठिकाणी राष्ट्रवादीमागे तर काही गावांत भाजपमागे जाण्याची शक्यता आहे.