ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चाचा निर्णय
By संतोष भिसे | Published: April 11, 2023 07:44 PM2023-04-11T19:44:05+5:302023-04-11T19:44:17+5:30
प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने घेतला निर्णय.
सांगली : प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयावर २१ मे रोजी जबाब दो आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांकडून मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
नाशिक येथे जेष्ठ नेते प्रा. कॉ. बानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महासंघाचे सरचिटणीस नामदेव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा झाली. कर्मचाऱ्यांसाठीच्या अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करून वेतनश्रेणी लागू करावी, किमान वेतन समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या सुधारीत वेतनाचे दर पुनर्निर्धारीत करावेत, किमान वेतनासाठी करवसुली व उत्पनाची जाचक अट रद्द करावी, पूर्ण वेतन व राहणीमान भत्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, सरसकट १०० टक्के अनुदान लागू करावे अशा मागण्या मांडण्यात आल्या.
बैठकीला महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, राज्य सह सचीव ॲड. राहुल जाधव, ए. व्ही. कुलकर्णी, मंगेश म्हात्रे, अमृत महाजन, सखाराम दुर्गुडे, हरीश्चंद्र सोनवणे, वसंतराव वाघ, नीलकंठ ढोके, उज्ज्वल गांगुर्डे, गोविंद म्हात्रे, सम्राट मोरे आदी उपस्थित होते.