ग्रामपंचायत सदस्यांनी जबाबदारी झटकू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:04+5:302021-05-21T04:27:04+5:30
गावोगावी आपत्ती व्यवस्थापन ग्रामसमित्या कार्यरत आहेत. यामध्ये काही गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांची नावे समाविष्ट नाहीत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य आपापल्या प्रभागातील ...
गावोगावी आपत्ती व्यवस्थापन
ग्रामसमित्या कार्यरत आहेत. यामध्ये काही गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांची नावे समाविष्ट नाहीत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य आपापल्या प्रभागातील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी या नात्याने ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या प्रभागातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची जबाबदारी पार पाडावी. याबाबतचे आदेश सरपंचांनी संबंधित सदस्यांना लेखी पत्राद्वारे द्यावेत. कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी केले आहे.
कडेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदींसह
आपत्ती व्यवस्थापन ग्रामसमित्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झाली. यावेळी तहसीलदार डॉ. शैलजा पाटील बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी दाजी दाइंगडे उपस्थित होते. डॉ. शैलजा पाटील म्हणाल्या, ग्रामपंचायत सदस्यांसह
आपत्ती व्यवस्थापन समित्यांनी गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या, तसेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे. विलगीकरणाच्या नियमांचा भंग होऊ नये याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. प्रसंगी कटूता पत्करावी लागली तरी चालेल. आपत्ती व्यस्थापन समित्यांनी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. गावातील सेवानिवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घ्यावी. गरज पडल्यास कमांडो नेमण्यात यावेत, अशी सूचना तहसीलदार पाटील यांनी दिली.
चौकट
ग्रामपंचायतींनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर
खरेदी करावेत
ज्या गावची लोकसंख्या तीन हजारपेक्षा
जास्त असेल त्या ग्रामपंचायतींनी दोन, तर तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असेल
त्या ग्रामपंचायतींनी एक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करावे, अशा सूचना गट विकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी दिल्या आहेत.