शहर विकासासाठी महाआघाडी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:42+5:302020-12-31T04:27:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेत भाजपची सत्ता असली, तरी शहराच्या विकासासाठी राज्यातील महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेत भाजपची सत्ता असली, तरी शहराच्या विकासासाठी राज्यातील महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग १५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व शास्त्रीनगरातील अंतर्गत रस्तेकामांचा त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका आरती वळवडे आणि पवित्रा केरीपाळे उपस्थित होते. कदम म्हणाले, शहरात अनेक समस्या आहेत. अपुर्या योजना आणि विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. महापालिकेचे उत्पन्न तोकडे असल्याने निधीअभावी विकास खुंटलेला आहे. उत्पन्नवाढीसाठी महापालिका प्रयत्नशील आहेच. सत्ता महापालिकेत भाजपची असली, तरी महाविकास आघाडीतील मंत्री म्हणून शहराच्या विकासासाठी शासनपातळीवर सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी उद्योजक मयूर पाटील, सिध्दार्थ कांबळे, किरणराज कांबळे, शुभम बनसोडे, चेतक कांबळे, राजीव कांबळे उपस्थित होते.