दादा घराणे विधानसभेच्या रिंगणाबाहेर - : चार महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:00 PM2019-10-03T23:00:50+5:302019-10-03T23:03:08+5:30
विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने दिला.
शीतल पाटील ।
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघावर नेहमीच वसंतदादा घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. वसंतदादांच्या हयातीत त्यांच्याच विचाराने दोनदा घराण्याबाहेरील उमेदवार देण्यात आला होता, पण त्यांच्या निधनानंतरही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सातत्याने या घराण्याचा मान राखला. पण गेल्या काही वर्षांपासून दादा घराण्याला उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. यंदा तर लोकसभा निवडणुकीवेळीही दादांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. आता विधानसभेलाही दादा घराण्याबाहेरील उमेदवार कॉँग्रेसने दिला आहे.
विधानसभा मतदारसंघाचे वसंतदादा घराण्याशी अतुट नाते राहिले आहे. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील या मतदारसंघातून विजयी झाले, तेव्हापासून हा मतदारसंघ दादा घराण्याचा बालेकिल्ला बनला. १९६७ मध्ये पहिल्यांदा दादा घराण्याबाहेरील उमेदवार काँग्रेसने दिला. पण तोही वसंतदादांच्या आदेशानेच. तेव्हा आप्पासाहेब बिरनाळे काँग्रेसचे उमेदवार होते.त्यांनी अपक्ष केशवराव चौगुले यांचा पराभव केला. १९७२ मध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेही विजयी झाले. १९७८ मध्ये पुन्हा वसंतदादांना उमेदवारी मिळाली. १९८० मध्ये शालिनीताई पाटील, १९८५ मध्ये पुन्हा वसंतदादा पाटील यांनी सांगली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
१९८६ च्या पोटनिवडणुकीत मात्र वसंतदादा घराण्याच्या वर्चस्वाला पहिल्यांदा शह बसला. या निवडणुकीत संभाजी पवार यांनी विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर १९९० मध्ये पुन्हा पवार-पाटील यांच्यात लढत झाली. तेव्हाही पवार विजयी झाले. १९९५ मध्ये काँग्रेसने विष्णुअण्णांच्या जागी वसंतदादांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मदन पाटील यांनी बंड केले. त्यामुळे दादा घराण्यातील फूट अधोरेखित झाली. संभाजी पवार यांनी सलग तिसऱ्यांदा वसंतदादा घराण्याचा पराभव करीत हॅट्ट्रिक केली. १९९९ मध्ये मात्र काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.
प्रकाशबापू पाटील हे काँग्रेससोबत राहिले, तर विष्णुअण्णा, मदन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.या निवडणुकीत काँग्रेसने प्रकाशबापूंना लोकसभेसाठी, तर दिनकर पाटील यांना सांगली विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात मदन पाटील व संभाजी पवार एकत्र आले, पण या निवडणुकीत दिनकर पाटील यांनी विजय प्राप्त करीत पुन्हा काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले. वसंतदादांच्यानंतर तब्बल १३ वर्षांनी सांगली मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आला.
२००४ च्या निवडणुकीत काँग्रेसने दिनकर पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यावेळी वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी बंडखोरी केली. दिनकर पाटील, मदन पाटील व संभाजी पवार अशी तिरंगी लढत झाली. यात मदन पाटील यांनी बाजी मारली. वसंतदादांनंतर मदन पाटील यांच्यारूपाने घराण्याला सांगलीत पहिल्यांदाच यश मिळाले. त्यानंतर २००९ व २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने मदन पाटील यांना उमेदवारी दिली. पण या दोन्ही निवडणुकीत भाजपचे संभाजी पवार व सुधीर गाडगीळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
लोकसभेनंतर : आता विधानसभेत...
२०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून वसंतदादा घराण्याच्या स्नुषा व मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. पण त्यांना डावलून काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे वसंतदादा घराणे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणाबाहेर झाले आहे. लोकसभेवेळीही वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी झगडावे लागले होते. काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असताना, ऐनवेळी तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला. शेवटी विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. चार महिन्यांच्या अंतरात काँग्रेसने वसंतदादा घराण्याला दुसऱ्यांदा धक्का दिला आहे.