पाचशे रोपं देऊन जागवल्या आजीच्या आठवणी
By admin | Published: August 2, 2016 12:42 AM2016-08-02T00:42:37+5:302016-08-02T00:58:14+5:30
झाडे बनून आजी देईल सावली : खानापूरमधील अमोल जाधव यांचा समाजिक उपक्रम
सातारा : जीवापाड प्रेम केलेल्या, जिच्या अंगा-खांद्यावर वाढलो, त्या आजीच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम जतन करण्यासाठी खानापूर येथील अमोल शंकरराव जाधव यांनी तब्बल पाचशे रोपे अन् साडेतीनशे परीक्षा पॅडचे वाटप केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या जीवाभावाच्या, रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मोठे दु:ख होते. त्यांच्या स्मृती जनत करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपक्रम राबवित असतो. काहीजण गावातील शाळा, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी गरजेच्या वस्तू भेट देतात. त्यांचा समाजाला कसे अन् किती कालावधीसाठी उपयोग होईल, हा गौण भाग असतो; मात्र त्यामागची भूमिका महत्त्वाची असते.
खानापूर येथील अमोल शंकरराव जाधव यांच्या आजी ताईसाहेब जाधव यांचे गेल्यावर्षी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. आजीच्या निधनानंतर वर्षभर त्यांच्या आठवणी येत होत्या. त्यांच्या निधनाला नुकतेच वर्षपूर्ती झाले. आजीच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी अमोल जाधव यांनी अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. समाज कार्याची जोड देत असताना रोपे वाटप करण्याचा निर्णय घेतला. हीच रोपे भविष्यात मोठी झाल्यास ते आजीसारखी मायेने लोकांना सावली देतील, ही त्यांची भूमिका होती.
त्यासाठी जाधव हे अनेक दिवसांपासून कामाला लागले. शिरवळ येथील खासगी रोपवाटिकेतून पाचशे रोपे खरेदी केली. यामध्ये आवळा, सीताफळ, शेवगा यासह अनेक जातीच्या रोपांचा समावेश होता. यावेळी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आलेल्या सुमारे पाचशे पाहुण्यांना रोपे प्रदान केले. या रोपांची लागवड करून त्यांची जोपासना करण्याचा संकल्प यावेळी आलेल्या पाहुण्यांनी जाधव यांच्याजवळ बोलून दाखविला. अमोल जाधव यांच्या या उपक्रमाचे वाई तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)