Sangli: द्राक्ष बागायतदारास १६ लाखांचा गंडा, चौघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:47 IST2025-01-06T12:47:07+5:302025-01-06T12:47:38+5:30

मुंबईतील एका व्यापाऱ्याचा समावेश

Grape grower robbed of 16 lakh in Sangli, case registered against four | Sangli: द्राक्ष बागायतदारास १६ लाखांचा गंडा, चौघांवर गुन्हा दाखल 

Sangli: द्राक्ष बागायतदारास १६ लाखांचा गंडा, चौघांवर गुन्हा दाखल 

विटा : दुबई व आखाती देशात माल पाठवून चांगला दर मिळवून देतो, असे आमिष दाखवून द्राक्ष व्यापाऱ्यांनी माहुली (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदार भरत दादासो सूर्यवंशी (वय ४८) यांना १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला.

याप्रकरणी द्राक्ष व्यापारी सलीम सरदार सय्यद, अधिक विठ्ठल पवार (दोघेही रा. विटा, ता. खानापूर), पशुपती रंगनाथ माळी (रा. सावर्डे, ता. तासगाव) व गंगाराम ऊर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण (रा. मुंबई) या चार द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. माहुली येथील द्राक्ष बागायतदार भरत सूर्यवंशी यांची सहा एकर द्राक्ष बाग आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापारी सलीम सय्यद, पशुपती माळी, अधिक पवार व मुकुंद चव्हाण हे सूर्यवंशी यांच्या द्राक्ष बागेत आले. त्यावेळी त्यांनी तुमचा द्राक्ष माल आखाती देशात पाठवून चांगला दर देतो, असे सांगितले. 

सूर्यवंशी यांनी व्यापाऱ्यांना पर्पल काळा हा ७ हजार ५३४ किलो माल प्रत्येकी १२० रुपये किलो दराने व एसएसएन लांबडा हिरवा हा ११ हजार २४ किलो द्राक्ष माल ६२ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना दिला. त्याची एकूण रक्कम १५ लाख ८७ हजार ६४८ होती. २ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संशयितांनी सर्व माल बागेतून काढून घेतला.

मात्र, सूर्यवंशी यांना पैसे दिले नाहीत. तगादा लावल्यानंतर सलीम सय्यद याने ४ लाख रुपये व दुसरा ४ लाख ५४ हजार १६० रुपये असे दोन धनादेश सूर्यवंशी यांना दिले. त्यातील चार लाखांचा एक धनादेश बँकेतून परत आला. त्यावेळी सूर्यवंशी यांनी त्याच्याशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

विटा पोलिसांत चौघांविरोधात फिर्याद

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकरी भरत सूर्यवंशी यांनी शनिवारी रात्री द्राक्ष व्यापारी सलीम सय्यद, अधिक पवार, पशुपती माळी व गंगाराम उर्फ मुकुंद चव्हाण या चार द्राक्ष व्यापाऱ्याविरुद्ध द्राक्ष माल घेऊन पैसे न देता माझी १५ लाख ८७ हजार ६४८ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल विटा पोलिसांत फिर्याद दिली.

Web Title: Grape grower robbed of 16 lakh in Sangli, case registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.