Sangli: द्राक्षदर कोसळले, उत्पादक बेदाणा निर्मितीकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 12:10 PM2024-02-02T12:10:54+5:302024-02-02T12:11:13+5:30

यंदा बेदाण्याचे उत्पादनही वाढणार

Grape growers in Sangli district tend to produce currants | Sangli: द्राक्षदर कोसळले, उत्पादक बेदाणा निर्मितीकडे वळले

Sangli: द्राक्षदर कोसळले, उत्पादक बेदाणा निर्मितीकडे वळले

संजयकुमार चव्हाण

मांजर्डे : तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम जोमात आहे. पण, बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. द्राक्षांचे पडलेले दर व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन झाल्याने बेदाणा उत्पादनातही विक्रमी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.

आरवडे, मांजर्डे, पेड, विसापूर, सावळज, मणेराजुरी परिसरात काही द्राक्ष उत्पादकांनी स्वतः शेड तयार करून बेदाणा उत्पादन सुरू केले आहे. तर, काही शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातून मजुरी देऊन बेदाणा करून घेण्याची व्यवस्था केली आहे.

वीस किलोमागे एक किलो सूट अशी शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारी पद्धत सुरू आहे. सुरुवातीला ४०० ते ४८० रुपये प्रतिपेटी असलेला भाव सध्या १०० ते १४० रुपयांपर्यंत घसरला आहे. या दराने उत्पादन खर्चसुद्धा हाती लागणार नाही. त्यामुळे बेदाणा निर्मितीस उत्पादक पसंती देत आहेत.

तासगाव व सांगली येथे बाजार समितीच्या सौद्यात बेदाण्याला चांगला भाव मिळत आहे. शिवाय तेथे फसवणूक होत नाही. त्यामुळे द्राक्ष विक्री केल्यास आर्थिक फटका बसेल, अशी भीती असणारे शेतकरी बेदाण्याकडे वळत आहेत. तासगाव व सांगलीत समितीमार्फत आयोजित सौद्यांना देशभरातून व्यापारी येतात. सर्व आर्थिक व्यवहारांवर बाजार समितीचे नियंत्रण असते. तेथे फसवणूक होत नसून इच्छेनुसार बेदाणा विक्री होते. बेदाण्यास सध्या दरही चांगला असल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बेदाण्यास किलोला ३० ते ३५ रुपये मजुरी

तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीसाठी रॅक तयार केले आहेत. किलोला ३० ते ३५ रुपये मजुरी आकारून बेदाणा तयार करून दिला जात आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या भागांतही बेदाणा उत्पादन वाढणार आहे. पुढील तीन महिने बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे तसेच उत्पादन जास्त असल्याने व बाजारात कमी मागणी असून दाक्षाचे दर घसरले आहेत. दर्जेदार द्राक्षे तयार केली तरच वाढीव दर व चांगले उत्पन्न मिळेल. -पृथ्वीराज पवार, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी.

Web Title: Grape growers in Sangli district tend to produce currants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली