जत तालुक्यात द्राक्ष काढणीची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:02+5:302021-03-28T04:25:02+5:30
ओळ : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथे द्राक्षे काढण्याची धांदल सुरू आहे. लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत तालुक्यात ...
ओळ : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथे द्राक्षे काढण्याची धांदल सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात द्राक्षे बागांमधील द्राक्षाची काढणीची धांदल सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना, अवकाळी पावसाचे कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे. माणिक चमन द्राक्षेला २५ ते २८ रुपये किलो दर आहे. महागडी औषधे, खते, मशागतीचा खर्च पाहता परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल झाली आहेत.
तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंडा माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. तालुक्यात ११ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षे बागा आहेत. यावर्षी प्रतिकूल हवामान, दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटावर मात करीत द्राक्षबागा आणल्या आहेत. काही शेतकऱ्यांना बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे.
द्राक्षे घड विरळ करण्यासाठी थिंनिंग केले आहे. थिंनिंगसाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. घडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे. अवकाळी पाऊस, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आगाप छाटणी घेतलेल्या बागेच्या उत्पादनात घट झाली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असतानाच कोरोना, अवकाळी पाऊस याचा फायदा घेत व्यापाऱ्याने दर पाडले आहे. त्यामुळे ‘द्राक्ष उत्पादक उपाशी, व्यापारी दलाल मात्र तुपाशी’ अशी स्थिती झाली आहे.
पाण्यावरील खर्च वाढला
पाण्यासाठी शेत तलाव, कूपनलिका, विहीर खुदाई करून लाखो रुपये खर्च केले आहेत. आजपर्यंत सर्वांत जास्त पैसे पाण्यावर खर्च झाले आहेत.
मजुरांची टंचाई
सध्या द्राक्षांची काढणी, द्राक्षे शेडवर टाकणे, बेदाणा शेड झाडणे, पेटी पॅकिंग करणे, आदी कामे मुजराकरवी केली जात आहेत. महिलेला २५० रुपये, पुरुषाला ५०० रुपये मजुरी आहे. ज्वारीची, गहूची काढणी मळणी सुरू आहे. सर्वत्र काढण्याची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई भासत आहे.
बेदाण्याला बऱ्यापैकी दर
आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड, कोरड्या हवामान तालुक्यात बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. सध्या बेदाणाला प्रतिकिलो दर १५० ते १८० रुपये दर आहे.