द्राक्ष हंगाम सुरू! नको व्यापाऱ्यांचा सततचा गंडा; हवा रोखीच्या व्यवहाराचा फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:06 PM2023-02-03T17:06:43+5:302023-02-03T17:07:12+5:30
तासगावच्या द्राक्षाची देशभर ख्याती असल्याने दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत देशभरातील अनेक व्यापारी तासगावात
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव तालुक्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष खरेदीसाठी देशभरातील व्यापारी तालुक्यात दाखल झाले आहेत. गेल्या चार वर्षांत द्राक्ष खरेदी करून तालुक्यात तब्बल १३ कोटी ६१ लाख रुपयांना गंडा घालण्याचे काम काही व्यापाऱ्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन दक्ष झाले आहे. व्यापाऱ्यांना नोंदी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गावपातळीवरदेखील व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश सरपंच आणि पोलिस पाटलांना दिले आहेत. मात्र तरीही व्यापाऱ्यांचा गंडा टाळायचा असेल, तर द्राक्ष विक्रीवेळी रोखीचा फंडा वापरणे आवश्यक आहे.
तासगाव तालुक्यात द्राक्ष काढणी आणि निर्यातीच्या हंगामाने वेग पकडला आहे. तासगावच्या द्राक्षाची देशभर ख्याती असल्याने दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत देशभरातील अनेक व्यापारी तासगाव तालुक्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूस अपवाद वगळला, तर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक ही नेहमीचीच गोष्ट ठरत आहे.
यावर्षी तासगाव पोलिस ठाण्याच्यावतीने तालुक्यात येणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम सुरू आहे. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी तालुक्यातील सरपंच आणि पोलिसपाटील यांना गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. द्राक्ष व्यापारी, एजंट यांची बैठक घेऊन त्यांना सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
साठ व्यापाऱ्यांच्या नोंदी
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिस प्रशासनामार्फत व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. आत्तापर्यंत साठ व्यापाऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी बहुतांश नोंदी स्वतः पोलिस प्रशासनाने माहिती घेऊन ठेवल्या आहेत. मात्र अपवाद वगळता द्राक्ष विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणतीच नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे सगळी भिस्त पोलिस प्रशासनावरच कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
व्यापारी, ट्रान्सपोर्ट, एजंट, पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन फसवणूक टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित व्यापाऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतींनी व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीदेखील रोखीतच मालाची विक्री करायला हवी. द्राक्षाच्या बाबतीत फसवणूक टाळण्यासाठी पोलिस प्रशासन सर्व पातळीवरून प्रयत्नशील आहे. - भानुदास निंभोरे, पोलिस निरीक्षक, तासगाव.