उत्पादकांकडून द्राक्षबागांना ‘सेंद्रीय मात्रा’!
By Admin | Published: January 6, 2015 10:47 PM2015-01-06T22:47:04+5:302015-01-07T00:03:35+5:30
नावीन्यपूर्ण प्रयोग : लिंबूचा रस, ताक, मैदा, पाल्याचा खत म्हणून वापर
प्रवीण जगताप -लिंगनूर -सांगली जिल्ह्यातील द्राक्षोत्पादक आपल्या शेतीतून दर्जेदार, निरोगी द्राक्षे उत्पादित करण्यासाठी अनेक तऱ्हेने आपला आटापिटा करीत आहेत. रासायनिक खते व औषधे यांच्या अतिवापराने द्राक्षझाडे कमकुवत बनविण्यापेक्षा आणि आपली द्राक्षे केवळ घडांनी नव्हे, तर आरोग्यवर्धकही रहावीत यासाठी आता रासायनिक मात्रेबरोबर सेंद्रीय मात्रेचा उपयोग करू लागले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये स्वानुभवाने व काही केवळ प्रयोग म्हणून द्राक्षशेती सुरक्षित, आरोग्यदायी व दर्जेदार द्राक्षोत्पादनासाठी त्यांचा वापर सुरू केला आहे.
मागील दहा वर्षांपासून काही प्रयोगशील व धाडसी द्राक्षोत्पादक करीत असून, त्यांची संख्या ३० ते पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये काही प्रयोग हे पारंपरिक आहेत, तर काही प्रयोगांचा दरवर्षी नव्याने काही द्राक्षोत्पादक करीत आहेत.
हे प्रयोग म्हणजे द्राक्षशेतीवरील सेंद्रीय मात्राच म्हणावी लागेल. या सेंद्रीय मात्रेमध्ये जनावरांचे कातडे, चपला निर्मितीतील टाकाऊ तुकडे, गूळ, लिंबाचा रस, गोमूत्र, शेण, ताक, बेसन पीठ, मैदा, उसाचा वाळलेला पाचोळा, वाळलेले गवत यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
विशेषत: कातडी, चप्पल निर्मितीचे कारखाने व उद्योग ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कातड्याचे टाकाऊ तुकडे मिळतात. येथील टाकाऊ तुकडे व कच्च्या मालाची स्वस्तात खरेदी करून नवीन द्राक्षबागेची लागण करताना याचा वापर करतात. द्राक्षबागेच्या नव्या लागणीसाठी खोदलेल्या चरीमध्ये या कातड्यांचे तुकडे टाकल्यास त्याचे दीर्घकाळ सेंद्रीय खत म्हणून उपयोग होतो. त्याचा पुढे रोपांच्या वाढीसाठी व दर्जासाठी फायदा होतो; तर गोमूत्राचा वापरही झाडांना केला जातो. गोमूत्र, गूळ, बेसन पीठ यांचे द्रावण व मिश्रण रोपांच्या मुळाशी ओतले जाते. गुळातून मिळणारे कॅल्शिअम झाडांना मिळू शकते तसेच गोमूत्र व शेणामुळे झाडास सेंद्रीय मात्रा मिळून झाडाच्या मुळीची कार्यक्षमता वाढते, तर या मिश्रणातून मिळणारे पोषक घटक रोपाला दीर्घकाळ मिळून त्याचा दीर्घकाळ लाभ होतो, असे त्या द्राक्षोत्पादक ांनी अनुभवले आहे.
तसेच द्राक्षघड तयार झाल्यानंतर झाडांच्या वरच्या बाजूला लिंबाचा रस पाण्यात मिसळून वर्षातून एखादा स्प्रे मारल्यास माल तयार झाल्यानंतर मण्यांना टोकाला येणारा अनावश्यक लालसर गुलाबी रंग येत नाही. त्यामुळे त्याचा बेदाणा निर्मितीत व मार्केटिंगवेळीही दर्जात लाभ होतो. त्यामुळे अशा द्राक्षांना व बेदाण्याला चांगले मार्केट व दर मिळणे शक्य होते, तर रासायनिक औषधांच्या अतिवापराने व फवारणीनंतर झाडाला काही काळ कमकुवतपणा निर्माण होतो.
या कमकुवतपणातून बाहेर पडण्यासाठी व ताण कमी करण्यासाठी ताकाचा उपयोग होतो. त्यामुळे पाने ताकदवान व सुदृढ राहतात.
पाचोळ्याचा उपयोग मल्चिंगसारखा
मागील अनेक वर्षांपासून द्राक्षांच्या झाडाखाली मल्चिंगसारखा उपयोग होईल म्हणून उसाचा वाळलेला पाचोळा व गवताचा पाचोळा यांचा उपयोग केला जात आहे. या पाचोळ्याचा झाडाच्या मुळाशी एकप्रकारचा जाड थर टाकला जातो. यामुळे मुळाशी पाण्याचा वापसा व मुळाजवळील पाण्याची ओल याचे नैसर्गिक नियंत्रण शक्य होते. तापमानही काहीअंशी मुळाजवळ नियंत्रित होते. त्याचा द्राक्षघड व माल तयार होताना चांगले लाभ होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा सेंद्रीय मात्रांमुळे द्राक्षे दर्जेदार निरोगी व खाण्यास लायक बनत आहेत. तर रासायनिक मात्रांना काही अंशी पर्यायही निर्माण होत असून, त्यांचा प्रयोगशील द्राक्षोत्पादक प्रयोग करीत आहेत.