कॅलिफोर्नियातून द्राक्षे, इराणचे सफरचंद; सांगलीच्या बाजारात फळांची रेलचेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:54 IST2024-12-14T17:53:13+5:302024-12-14T17:54:13+5:30
दरही आवाक्यात, हिवाळ्यात आरोग्यासाठी अवश्य खा

छाया : सुरेंद्र दुपटे
सांगली : हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणात आरोग्याची भर टाकण्यासाठी बाजारात देशी-विदेशी फळांची रेलचेल झाली आहे. त्यांचे दरही आवाक्यात असून सांगलीकर फळांवर ताव मारताना दिसत आहेत.
बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस यांसारख्या देशी फळांची आवक वाढली आहे. मार्गशीर्ष या उपवासाच्या महिन्यामुळेही भाज्या व फळांची रेलचेल आहे. उपवास आणि पुजेसाठी फळांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विष्णूअण्णा पाटील फळ बाजारात दररोज पहाटे कित्येक टन फळांचे घाऊक सौदे निघत आहेत. त्यानंतर ती किरकोळ विक्रीसाठी सांगली-मिरजेसह जिल्हाभरात जात आहेत.
फळांचे किरकोळ दर
भारतीय सफरचंद १२० ते १४०, इराणी सफरचंद १८० ते २००, आयात सफरचंद २५० ते २६०, मोसंबी १००, नागपूर संत्री ६० ते ७०, सीताफळ ८० ते १००, पेरू ६० ते ८०, ॲपल बोरे ४० ते ७०, ड्रॅगन फ्रुट ७० ते ८०, डाळिंब १८० ते २०० (सर्व दर प्रतिकिलो), पपई एक नग ३० ते ५०, किवी ८० ते १०० रुपये बॉक्स, कलिंगड ८० ते १००, अननस ६० ते १००
टेबलफ्रुट द्राक्षे आणि आरोग्यदायी ॲवाकेडो
कॅलिफोर्नियातून आलेली लाल-काळी द्राक्षेही भाव खात आहेत. ही गोल, गरगरीत द्राक्षे चवीला फार गोड नसली, तरी टेबलफ्रुट म्हणून डायनिंग टेबलवर जागा मिळवत आहेत. क जीवनसत्त्व असणारे व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे ॲवाकेडोदेखील भाव खाऊन आहे. १०० रुपयांना नग यानुसार विक्री सुरू आहे.
फळे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. सध्या विविध देशी-विदेशी फळांचा हंगाम जोरात असल्याने बाजारातही आवक वाढली आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक फळे खाण्याचा आनंद घेत आहेत. - कुमार नरळे, फळ विक्रेता