द्राक्षे, डाळिंब दरात घसरण
By admin | Published: May 19, 2017 12:27 AM2017-05-19T00:27:44+5:302017-05-19T00:27:44+5:30
द्राक्षे, डाळिंब दरात घसरण
गजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : अवकाळी पाऊस, कडक ऊन, व्यापाऱ्यांची नफेखोर वृत्ती, यामुळे द्राक्षे, डाळिंबांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. औषधे, खतांच्या वाढत्या किमती, वाढता मशागतीचा खर्च, टॅँकरचा खर्च, दुष्काळी परिस्थिती यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच दरात घसरण झाल्याने जत तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. बाजारात डाळिंबे न पाठविताल ती तोडून जनावरांना घालण्याची वेळ आली आहे.
जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजाड, फोंड्या माळरानावर बागा उभारल्या आहेत. खडकाळ जमीन, स्वच्छ वातावरण, आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करीत दर्जेदार उत्पादन घेत आहेत. तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. उमदी, तिकोंडी, बिळूर, संख, डफळापूर, रामपूर, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, अमृतवाडी, कोंतेव बोबलाद, करजगी, हळ्ळी, बालगाव, बेळोंडगी, जालिहाळ बुद्रुक, अंकलगी, मुचंडी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.
अंकलगी, संख परिसरातील काही बागायतदार जुलै महिन्यामध्ये अगाप द्राक्ष छाटणी करतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये ते द्राक्षे बाजारात विक्रीला आणतात. तसेच बहुतांशी बागायतदार सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतात. पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, करजगी परिसरामध्ये छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. हा माल एप्रिलच्या शेवटी व मे महिन्यामध्ये बाजारात येतो. अनुकूल वातावरणामुळे दावण्याचा प्रादुर्भाव कमी असतो. एकरी २५ ते २० टन कच्चा माल काढला जातो. साखर १०० टक्के भरते. बेदाण्यापेक्षा मार्केटिंगची द्राक्षे परवडतात, असे बागायतदारांचे मत आहे.
जोरदार वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा धोका असतो. सध्या हा माल बाजारात आला आहे. दर कमी झाला आहे. सध्या २० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १० हजार ३४४.५९ हेक्टर आहे. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशीलिंगवाडी, शेगाव, सोन्याळ, जाडरबोबलाद, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर येथील शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादन केले आहे. सध्या बाजारात डाळिंबाचा दर कमी झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गणेश ५ ते १० रुपये किलो, तर केदार प्रति किलो १५ ते २० रुपये दराने घेतला जात आहे. दिल्ली, बेंगलोर, विजयवाडा, चेन्नई, मदुराई, नागपूर याठिकाणी अवकाळी पावसाचे कारण दाखवून डाळिंबाचा दर कमी केला आहे. दरीबडची (ता. जत) येथील अशोक जामगोंडा या शेतकऱ्याने गणेश जातीची ३ टन डाळिंबे पाठविले होती. दर कमी मिळाल्याने त्यांना स्वत:जवळील २५०० रुपये द्यावे लागले.
खते, महागडी औषधे, मशागतीचा खर्च मोठा झाला आहे. लागवड खर्चसुध्दा निघत नाही. टॅँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. होणारा तोटा व पाणी नसल्याने बागा शेतकरी काढून टाकणार आहेत.
चार वर्षात द्राक्षाचे घसरलेले प्रतिकिलो दर
द्राक्षाची जातदर मे-एप्रिल २०१७२०१६२०१५२०१४
शरद २४ रु.६८ रु.६७ रु.७१ रु.
माणिक चमन२६ रु.६२ रु.५८ रु.६० रु.
सुपर सोनाक्का२२ रु.६४ रु.६२ रु.६८ रु.
थॉमसन२० रु.५८ रु. ५४ रु. ५२ रु.