शामरावनगरला मोकळ्या प्लाॅटमध्ये गवताचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:22 AM2021-05-30T04:22:08+5:302021-05-30T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शामरावनगरमधील रॉयल कॉलनी परिसरात पाणगवत आणि दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कॉलनीतील रस्त्याचीही प्रचंड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शामरावनगरमधील रॉयल कॉलनी परिसरात पाणगवत आणि दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कॉलनीतील रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामीं पावसाळ्यात नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत अनेक वर्षांपासून तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. नगरसेवक, महापालिका पशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
शहरातील अनेक विस्तारित गुंठेवारी परिसरात पावसाळ्यात प्रचंड दैना उडते. पाण्याचा निचरा होत नसल्याने दलदल निर्माण होते. शामरावनगरमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. रॉयल कॉलनी येथील नागरिक वर्षानुवर्षे अशा समस्यांना तोड़ देत आहेत. कॉलनी परिसरात अनेक भूखंड मोकळे आहेत. या भूखंडांवर पाणगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भूखंड स्वच्छ करून घेतले जात नाहीत. गवताची कूस नागरिकांच्या घरात जाऊन पडते. काही ठिकाणी पाणी साचून राहते. परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक तसेच महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काॅलनीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दलदलीतून नागरिकांना वाट काढत जावे लागते. या रस्त्याचे काम का होत नाही, याची चौकशी करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.