बेडगमध्ये कडकडीत बंद
By admin | Published: March 27, 2016 12:41 AM2016-03-27T00:41:36+5:302016-03-27T00:41:36+5:30
शेतकऱ्यांची जामिनावर सुटका : गावात पोलिस बंदोबस्त; ग्रामस्थांकडून निषेध
मिरज : पाण्याच्या मागणीसाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव घातल्याबद्दल शेतकऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ बेडग (ता. मिरज) येथे ग्रामस्थांनी शनिवारी बंद पाळला. अटक करण्यात आलेल्या सहा शेतकऱ्यांची शनिवारी जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवस्वराज्य संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
कळंबी शाखा कालव्याचे पाणी बंद करण्याला विरोध करून बेडग येथे शेतकऱ्यांना पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव घालून ग्रामपंचायत कार्यालयात अडवून ठेवले. याप्रकरणी पाटबंधारे शाखा अभियंता सदाशिव हादिमनी यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर बाळासाहेब नलवडे, बाळासाहेब माळी, मल्हारी नागरगोजे, गोपाळ शेळके, शांतिनाथ लिंबिकाई, रावसाहेब अंकलखोपे या सहा शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. अन्य ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बेडग ग्रामस्थांनी शनिवारी बंद पाळला. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व व्यवहार बंद होते. अटक झालेल्या सहा शेतकऱ्यांची दुपारी जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांचा गावात सत्कार करण्यात आला.
शिवस्वराज्य संघटनेतर्फे अॅड. के. डी. शिंदे, अजितराव सूर्यवंशी, चंद्रशेखर पाटील, संपतराव पवार उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांवर आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप केला. पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बेडग बंदच्या पार्श्वभूमीवर गावात मोठा बंदोबस्त होता. (वार्ताहर)