नागनाथअण्णांना अभिवादन
By admin | Published: July 15, 2016 11:11 PM2016-07-15T23:11:24+5:302016-07-15T23:57:05+5:30
वाळव्यात विविध कार्यक्रम : शैक्षणिक संस्थांची प्रभातफेरी, वृक्षारोपण
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९४ व्या जयंतीदिनी शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांचे पुत्र आणि हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी साखर कारखाना कार्यस्थळी समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
सकाळी सात वाजता किसान शिक्षण संस्थेच्या हुतात्मा किसन अहिर विद्यालय, जिजामाता विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नं. १, २ व ३, हुतात्मा किसन अहिर प्राथमिक विद्यालय, हुतात्मा नर्सिंग कॉलेज, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी सैनिक व निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभातफेरी काढली. वैभव नायकवडी यांच्याहस्ते प्रभात फेरीस प्रारंभ करण्यात आला. वाळव्याबरोबरच शिरगाव (ता. वाळवा), नागठाणे (ता. पलूस) येथीलही सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली.
शिरगाव येथे सिद्धेश्वर मंदिर परिसर येथे माजी सरपंच राजाराम शिंदे, तानाजी हवलदार, कारखाना संचालक एकनाथ वाघमारे, बबन हवलदार, बाळासाहेब माने यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावरील वृक्षारोपणानंतर प्रभातफेरी समाधीस्थळी आल्यानंतर उपस्थित सर्वांना हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.
साखर शाळेतील क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले. हुतात्मा बॅँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, हुतात्मा कारखाना संचालक सुरेश होरे, बाळासाहेब तांदळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, डी. एम. अनुसे, शेती अधिकारी दीपक पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष भगवानभाऊ पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, संजय होरे, हुतात्मा बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष दिनकर बाबर, मारुती चव्हाण, उपाध्यक्ष महंमद चाऊस, रमेश आचरे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सावकर कदम, पांडुरंग अहिर, पोपट अहिर, अजित वाजे, जयवंत अहिर, नंदू पाटील, उपसरपंच अपर्णा साळुंखे, उमेश घोरपडे, बाजीराव नायकवडी, प्रा. बाळासाहेब नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
मान्यवरांकडून वृक्षारोपण
सकाळी नऊ वाजता हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या डिस्टिलरी प्लॅँट परिसरात अध्यक्ष नायकवडी व मान्यवरांच्याहस्ते आंबा, नारळ, चिक्कू आदी फळरोपांचे रोपण करण्यात आले. शिरगाव येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.