शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 12:32 PM2022-01-01T12:32:11+5:302022-01-01T12:37:17+5:30
अशोक डोंबाळे सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. ...
अशोक डोंबाळे
सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. यंदा पावसाची जत तालुक्यावर कृपादृष्टी राहिल्यामुळे दुष्काळाचे सावट मिटले आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांची पाणीपातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षणच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाळवा, शिराळा येथे सर्वाधिक पाऊस होऊनही भूजल पातळी घटली आहे.
जिल्ह्याची सप्टेंबरमधील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ३.७९ मीटर आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ०.३८ मीटरने वाढून ती ३.४२ मीटरवर स्थिर झाली. जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस या सहा तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीत सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.
जत तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळी १.४५ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी ०.०७ मीटरची वाढ खानापूर तालुक्यात नोंदविली आहे. भूजल पातळी १.०८ मीटरने वाढून कवठेमहांकाळ तालुका दुसऱ्या स्थानावर आहे, तर ०.९२ मीटरने भूजल पातळी वाढून तासगाव तालुका तिसऱ्या स्थानावर आहे.
परतीच्या पावसाने काही तालुक्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा फायदा होणार आहे. गहू, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, तसेच टँकरवर अवलंबून असणारा जत तालुका टँकरमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.
मिरज तालुक्यातील -०.१९ मीटर, वाळवा -०.३२, शिराळा -०.२३ आणि कडेगाव तालुक्यातील भूजल पातळी -०.१७ मीटरने घटली आहे. वास्तविक पाहता या चारही तालुक्यांत सरासरी ५०० मीटरपेक्षा जास्त पाऊस होत असूनही भूजल पातळी घटल्यामुळे चिंतेची बाब आहे.
जिल्ह्याची भूजल पातळी (प्रति मीटर)
तालुका | पातळी वाढ |
मिरज | -०.१९ |
जत | १.४५ |
खानापूर | ०.०७ |
वाळवा | -०३२ |
तासगाव | ०.९२ |
शिराळा | -०.२३ |
आटपाडी | ०.८३ |
क.महांकाळ | १.०८ |
पलूस | ०.३४ |
कडेगाव | - ०.१७ |
एकूण | ०.३८ |
वर्षातून चार वेळा नोंदी
पाणी पातळीतील वाढ किंवा झालेली घट यात अचुकता येण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची संख्या दुप्पट केली आहे. त्यांचे मोजमामही तीन वर्षांपासून सुरू आहे. पाच वर्षे नियमित मोजणी झाल्यानंतर त्या नोंदींचा विचार केला जाईल. त्यामुळे अचूकता वाढणार आहे. वर्षातून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि सप्टेंबरमध्ये पाणीपातळीचे मोजमाप केले जाते.