सांगली जिल्ह्याच्या भूजलपातळीत यंदा एक मीटरने वाढ, पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:14 PM2022-11-24T12:14:25+5:302022-11-24T12:14:55+5:30
जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे.
सांगली : यावर्षी जिल्ह्यात पावसाळा व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे तलाव, विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढली आहे. यंदा ऑक्टोबरअखेर जिल्ह्यातील भूजलपातळीत ०.९७ मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे. त्यात यंदा पाऊसही समाधानकारक झाला आहे. नियमित माॅन्सूनपेक्षा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बहुतांश तलाव, ओढे भरले होते. यामुळेच भूजलपातळीत वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्या वतीने यंदा ८६ विहिरींचे निरीक्षण करून याबाबतच अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ऑक्टोबरमध्ये २.६८ मीटर भूजलपातळी आढळून आली. सरासरी ०.९७ मीटर वाढ झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी दुष्काळी म्हणून नोंद असलेल्या जत आणि आटपाडी तालुक्यात यंदा समाधानकारक भूजलपातळी वाढली आहे. त्या तुलनेत पाणलोट क्षेत्र असलेल्या तालुक्यात भूजलपातळीत कमी वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अहवालावरच विंधन विहिरींसह इतर विहिरींसाठी परवानगी मिळत असते. यंदा मात्र सर्वच तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झाल्याने कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
तालुका | सध्याची भूजलपातळी | भूजलपातळीत झालेली वाढ (मीटरमध्ये) |
मिरज | २.४५ | ०.१३ |
जत | ३.३९ | १.८५ |
खानापूर | २.९४ | १.१३ |
वाळवा | १.६१ | ०.३३ |
तासगाव | ४.४२ | १.३१ |
शिराळा | ०.८९ | ०.२१ |
आटपाडी | ३.२९ | १.०९ |
कवठेमहांकाळ | २.६७ | १.८५ |
पलूस | १.४५ | १.१५ |
कडेगाव | ३.६५ | ०.६३ |